मुंबई: आफ्रिकेतील देशांमधून मुंबईत दाखल झालेल्यांपैकी आणखी तीन प्रवाशांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता मुंबईत एकूण चार करोनाबाधित प्रवासी झाले असून यांना मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे.

आफ्रिकेसह अन्य जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा शोध पालिकेने सुरू केला असून यात पहिल्या टप्प्यामध्ये १२ नोव्हेंबरपासून आफ्रिकेतून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले. यातील १०० मुंबईत राहणारे असून याच्या करोना चाचण्या पालिका करत आहे. अंधेरीत वास्तव्यास असणाऱ्या एका प्रवाशाला करोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी आढळले आहे. यानंतर बुधवारी आणखी तीन प्रवासी बाधित असल्याचे आढळले आहे.

ओमायक्रॉनमुळे बाधा झाली असण्याची शक्यता कमी

अंधेरीत राहणाऱ्या प्रवाशाच्या एस जनुकीय घटकाचा वापर केलेली आरटीपीसआर चाचणी मंगळवारी केली गेली. यात एस जनुकीय घटक उपलब्ध असल्याचे आढळले होते. त्यामुळे त्याला ओमायक्रॉनमुळे बाधा झालेली असण्याची शक्यता फार कमी आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अन्य तीन प्रवाशांचीही चाचणी

बाधित असलेल्या आणखी तीन प्रवाशांच्या एस जनुकीय आरटीपीसीआर चाचण्या बुधवारी केल्या असून याचे अहवाल बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळी येण्याची शक्यता आहे. सध्या तरी एकही ओमायक्रॉनचा रुग्ण मुंबईत आढळलेला नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

यांच्या जनुकीय चाचण्या पुढील टप्प्यांमध्ये

डोंबिवलीत आढळलेल्या बाधित प्रवाशासह या परदेशातून आलेल्या बाधित रुग्णांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी शनिवारीच पाठविले असून याचे अहवाल येत्या शनिवारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नव्याने आढळलेल्या या बाधितांचे नमुने पुढच्या टप्प्यातील जनुकीय चाचण्यांमध्ये दिले जातील. त्यामुळे याबाबत खात्री होण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे काकाणी यांनी सांगितले.

पालिकेचे नियंत्रण कक्ष कार्यरत

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये आफ्रिकेसह अन्य जोखमीच्या देशांमधून सुमारे दोन हजारांहून अधिक प्रवासी उतरले असून याची यादी पालिकेला प्राप्त झालेली आहे. पत्त्यानुसार यांचे वर्गीकरण करणे सुरू असून करोना नियंत्रण कक्षामधून यांना संपर्क साधले जात आहेत. यातील सर्व बाधितांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविले जात आहेत, तर मुंबईत वास्तव्यास असलेल्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.

आज बैठक .. परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांचे विलगीकरण करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने बुधवारी दिले आहेत. आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करणे गरजेचे आहे; परंतु आता ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेल्या देशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एक किंवा अगदी कमी संख्येने रुग्ण आढळलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांचेही संस्थात्मक विलगीकरण करावे का, असा प्रश्न पालिकेपुढे निर्माण झाला आहे. यासंबंधी ठोस नियमावली ठरविण्यासाठी पालिकेची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे.