मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथील तीन रेल्वे पोलिसांनी एका सराफाला कायद्याचा धाक दाखवून, मारहाण करून, त्याच्याकडील ३० हजार रुपये लुटण्याची घटना घडली होती. यात सहभागी असलेल्या ललित जगताप, राहुल भोसले, अनिल राठोड या तीन रेल्वे पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

मुळचे राजस्थानमधील असलेले तक्रारदार कमलकुमार सोनी (३७) सराफ आहेत. ते १ ऑगस्ट रोजी आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह सोन्याच्या एका प्रदर्शनासाठी मुंबईत आले होते. त्यांच्याकडे १४ ग्रॅम शुद्ध सोन्याचा तुकडा आणि रोख ३१,९०० रुपये होते. ते १० ऑगस्ट रोजी पुन्हा राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते. त्यांची रात्री ११ वाजता दुरान्तो एक्स्प्रेस होती. त्यामुळे ते रात्री साडेदहाच्या सुमारास मुलीसह मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचले. फलाट क्रमांक ५ वर ते आले असता, एका रेल्वे पोलिसाने सोनी यांना थांबवले आणि त्यांची बॅग तपासली. त्याच्यासोबत आणखी दोन रेल्वे पोलिस तेथे होते.

त्या पोलिसांना सोनी यांच्या बॅगेत सोन्याचा तुकडा आणि ३१ हजार ९०० रूपये आढळले. त्याबद्दल त्या पोलिसांनी जाब विचारला. सोन्याच्या पावत्या असल्याचे सोनी यांनी सांगितल्यानंतरही पोलिसाने त्यांना मुलीसमोर शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फलाटाजवळच्या एका अंधाऱ्या खोलीत नेऊन दमदाटी करत अटक करण्याची धमकी त्यांना दिली. सोनी आणि त्यांच्या मुलीने विनंती करून देखील रेल्वे पोलिसांनी त्यांना सोडले नाही. रेल्वेगाडी सुटण्याची वेळ झाल्याने आणि सोन्याचा तुकडा परत करून रोख रक्कम ३० हजार रुपये घेऊन पोलिसांनी त्यांना सोडून दिले.

रेल्वेगाडीने राजस्थानला पोहोचल्यावर सोनी यांनी या घटनेची रतनगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा गुन्हा मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सोनी यांच्या तक्रारीवरून १७ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई सेंट्रल पोलिस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११९ (१) अंतर्गत गंभीर दुखापत करून मालमत्ता उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, या प्रकरणाचा शोध घेतल्यानंतर तीन रेल्वे पोलिसांना निलंबित करण्यात आले. आता मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक ललित जगताप, पोलिस हवालदार राहुल भोसले, पोलिस हवालदार अनिल राठोड त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.