मुंबई : मुंबईमधील डोंगर उतारावरील वस्त्यांमध्ये दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा तेथे प्रथमच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) तीन अतिरिक्त तुकडय़ा तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळय़ात दरड कोसळू नये यासाठी संबंधित ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी, असे आदेश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दिले.

आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मुख्यालयात गुरुवारी पावसाळापूर्व कामांची माहिती घेण्यासाठी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, पी. वेलरासू, संजीव कुमार, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर आदी होते.

मुंबईत एनडीआरएफच्या तीन तुकडय़ा सदैव तैनात असतात. याव्यतिरिक्त एनडीआरएफच्या आणखी तीन तुकडय़ा पावसाळय़ात मुंबईत तैनात करण्यात येणार आहेत. या अतिरिक्त तुकडय़ांची कुमक पालिकेच्या एस, एम-पश्चिम आणि एन विभागात तैनात करण्यात येणार आहेत. दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन तुकडय़ांकडे आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एनडीआरएफच्या एका तुकडीत ४५ जवानांचा समावेश असतो. त्यानुसार मुंबईत १३५ जवान तैनात असणार आहेत. या व्यतिरिक्त आणखी १३५ जवान दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी सज्ज असणार आहेत. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमधील नागरिकांना पर्यायी घरे उपलब्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

‘नालेसफाई नियोजित वेळेत पूर्ण करावी’

पावसाळय़ापूर्वी हाती घेण्यात आलेली नालेसफाईची कामे नियोजित वेळापत्रकानुसार ३१ मेपर्यंत पूर्ण करावी, संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे क्षेत्रीय भेटी देऊन कामांचा आढावा घ्यावा आणि वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही करून घ्यावी, असे आदेशही आदित्य ठाकरे यांनी दिले. नद्या आणि नाल्यांतून काढलेला गाळ काठावर ठेवण्यात येतो. पुन्हा तो नदी-नाल्यात जाण्याची शक्यता असते. याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

समन्वय अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश

पावसाळय़ात रस्त्यांची नियमित पाहणी आणि परीरक्षण, रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्यासाठी समन्वय साधणे आणि संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून पुढील तीन वर्षांमध्ये रस्ते कामाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवसातून दोन वेळा स्वच्छता करा

पावसाळय़ात घनकचऱ्याचे व्यवस्थापन परिणामकारकपणे करणे गरजेचे आहे. यादृष्टीने आवश्यक तेथे दिवसातून दोन वेळा स्वच्छता करावी, तसेच वेळोवेळी कचरा उचलण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले.

नागरिकांशी संवाद साधावा

ट्विटर, व्हॉटस्प चॅटबॉट यासारख्या समाज माध्यमांचा वापर करून नागरिकांशी नियमितपणे संवाद साधाला. संवाद माध्यमांद्वारे नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत वेळच्या वेळी तातडीने कार्यवाही करावी. विभागस्तरीय सहायक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील नागरिकांशी थेट संवाद साधावा. त्यांची मते व सूचना जाणून घ्याव्यात आणि योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.