मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात शनिवारी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अजूनही तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. येथील १४व्या गल्लीत असणारी ही दुमजली इमारत आज दुपारी अडीचच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशामन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली. मात्र, हा भाग दाटीवाटीचा असून याठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्ती कामांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आत्तापर्यंत ढिगाऱ्याखालून आठजणांना बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य संपल्याची माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आता मातीचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून याठिकाणी पोलीस आणि पालिकेचे अधिकारीदेखील उपस्थित आहेत.
या इमारतीच्या तळ मजल्यावर बार होता आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जरीचे कारखाने होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. इमारत कोसळली तेव्हा त्याठिकाणी १५ लोक उपस्थित असल्याचे समजते. ते सगळे ढिगाऱ्याखाली अडकले होते.  जखमींना उपचारासाठी सैफी, नायर आणि जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.