मुंबईः कुर्ला पूर्व येथे एटीएम मशीन फोडून तीन चोरट्यांनी तीन लाखांची रोख रक्कम चोरल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सहकारी बँकेच्या या एटीएम सेंटरमध्ये झालेल्या चोरीनंतर तिन्ही आरोपीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एटीएम सेंटरच्या सीसीटिव्ही चित्रीकरणाच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
तक्रारदार संतोष वसंत शेळके हे डोबिवलीतील विष्णूनगर परिसरात राहत असून एका सहकारी बँकेत मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्या बँकेची कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात एक शाखा आणि एटीएम सेंटर आहे. गुरुवारी(ता.५) दुपारी अडीच वाजता बँक कर्मचार्यांनी एटीएममध्ये तीन लाखांची रोख रक्कम जमा केली होती. एटीएमची तपासणी केल्यांनतर त्यात पूर्वीची रक्कम मिळून एकूण आठ लाख सात हजार पाचशे रुपये शिल्लक होते. शनिवारी बकरी ईद असल्यामुळे बँकेला सुट्टी होती. त्यावेळी बँकच्या आयटी विभागाच्या सुरक्षा रक्षकाचा दूरध्वनी आला. बँकेच्या एटीएममध्ये रोेख रक्कम ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा कंटेनर (कॅसेट) दुसऱ्या एटीएम मशीनच्या शेजारी ठेवलेला दिसत असल्याचे त्यांनी कळवले. त्यावेळी तक्रारदार यांनी इतर सहकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. तसेच तेही घरातून एटीएम सेंटरच्या दिशेने रवाना झाले. ते पोहोचले असता कॅसेट शेजारी ठेवण्यात आला होता. तसेच संबंधीत एटीएम यंत्र बंद करण्यात आली होती. बँक अधिकाऱ्यांनी तेथील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी शुक्रवारी सकाळी सव्वासहा वाजता एटीएम सेंटरमध्ये तीन तरुण आले होते. त्या तिघांनी बँकेचे एटीएम फोडून आतील रोकड चोरली. सुमारे तीन लाख रुपयांची रोकड आणि पंधरा हजाराची कॅसेट असा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला होता.
चोरी कशी झाली ?
हा संपूर्ण प्रकार सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे त्याने संतोष शेळके यांच्यासह इतर बँक कर्मचार्यांना ही माहिती दिली. त्यानंतर बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन एटीएम सेंटरच्या सीसीटिव्ही चित्रीकरणाची पाहणी केली. त्यावेळी तीन तरूण एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करत असताना दिसून येत आहेत. आरोपींनी प्रथम एटीएमचा खालच्या बाजूचा दरवाजा उघडला. त्यातील कॅसेट बाहेर काढले. त्यातील तीन लाखांची रोख रक्कम घेऊन पलायन केले. या प्रकार लक्षात आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी याप्रकरणी स्थानिक नेहरू नगर पोलिसांकडे तक्रार केली. बँकेकडून एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडे सुपुर्त करण्यात आले आहे. . या तक्रारीनंतर नेहरू नगर पोलिसांनी तीन अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने शोध सुरू आहे.