प्रवाशांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक दर्जाचे नवीन तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. यामध्ये काही जुन्या कॅमेऱ्यांच्या बदल्यात नवीन कॅमेरे बसवण्यात येतील. निर्भया योजनेंतर्गंत हे कॅमेरे मार्च २०२३ पर्यंत बसवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.

हेही वाचा- आरेत आणखी एक बिबट्या जेरबंद; ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरु होता शोध

मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकाचा पसारा हा सीएसएमटी ते कर्जत, कसारा, खोपोली, पनवेल, अंधेरीपर्यंत आहे. मुंबई विभाग हा कर्जत, कसाऱ्याबरोबरच लोणावळा, इगतपुरीपर्यंत येतो. या मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे हद्दीत एखादा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हीव्दारे त्या गुन्ह्य़ाचा यशस्वीरीत्या तपास करण्यास मदत होते. परंतु लाखो प्रवासी संख्या, वाढलेले गुन्हे पाहता सीसीटीव्हींची संख्या पुरेशी नाही, त्यांचा दर्जाही चांगला नाही. त्यामुळे मुंबई विभागातील सीसीटीव्हींचा विषय नेहमीच चर्चेत असतो. सध्या मुंबई विभागातील ७५ हून अधिक रेल्वे स्थानकात ३ हजार १०० पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

हेही वाचा- लोकल विलंबाचा मध्य रेल्वे प्रवाशांना पुन्हा जाच; तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रक विस्कळीत  

यातील काही जुने सीसीटीव्ही कॅमेरे असून ते बदलून नवीन कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे वरिष्ठ विभागिय सुरक्षा आयुक्त (आरपीएफ) ऋषी शुक्ला यांनी सांगितले. काही स्थानकात कॅमेरा बसवण्यासाठी नवीन ठिकाणे शोधण्यात आली असून तेथेही कॅमेरे बसविले जातील. एकूण तीन हजार नवीन कॅमेरे असून गर्दीत गुन्हेगारांचा चेहेरा ओळखून (फेस रिकग्निशन सिस्टिम) नियंत्रण कक्षाला अलर्ट देणाऱ्या काही कॅमेऱ्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त नवीन सीसीटीव्हींची सुरक्षा दलाला प्रतिक्षा असून ते लवकरच उपलब्ध होणार आहेत. मार्च २०२३ पर्यंत कॅमेरे बसवण्याचे उद्दिष्ट असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. काही कॅमेरे हे फलाटात लोकलचा महिला डबा येतो तेथे, प्रवेशद्वार, पादचारी पूल तसेच स्थानकांना जोडणाऱ्या आकाशमार्गिका आणि फलाटांचे शेवट या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.

हेही वाचा- करोनाच्या ‘एक्सबीबी’चा वेगाने प्रसार; ठाण्यात १० रुग्णांची नोंद; मुंबईलाही धोका

एकात्मिक सुरक्षा यंत्रणेअंतर्गंत मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, दादर, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण स्थानकांत नवीन सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. निर्भया योजनेतर्गंत मुंबई विभागातील भायखळा, परळ, घाटकोपर, मुलुंड, दिवा, कोपर, डोंबिवली, कसारा, इगतपुरी, खोपोली, वडाळा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, पनवेल यासह अन्य स्थानकात निर्भयांतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.