मुंबई : गेल्या तीन दिवसांत देशभरातील ७० संकेतस्थळे ‘हॅक’ झाली आहेत. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ, ठाणे पोलीस  आणि उत्तन ज्युडिशियल अकादमी या संकेतस्थळांचा समावेश होता. याप्रकरणी राज्य सायबर विभागाने चौकशीला सुरुवात केली असून यामध्ये पॅलेस्टाईन येथील हॅकर्स गटाचा हात असल्याचा संशय आहे.

देशात धार्मिक तणाव निर्माण झाल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून देशभरातील संकेतस्थळे हॅक होऊ लागली. प्राथमिक माहितीनुसार ही संख्या ७० आहे, तर राज्यातील तीन संकेतस्थळे ‘हॅक’ झाली; पण विदा चोरी झाल्याची तक्रार नाही. याप्रकरणी सायबर विभाग अधिक तपास करत असून लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त महासंचालक (आर्थिक गुन्हे) मधुकर पांडे यांनी सांगितले.

राज्यातील तीनही संकेतस्थळे मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ‘हॅक’ करण्यात आली. पॅलेस्टाईन येथील हॅक्टिव्हिजम (सामाजिक अथवा राजकीय कारणासाठी सायबर हल्ला करणे) गटाचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय आहे; पण सखोल तपासणीनंतर या गटाची नेमकी माहिती मिळू शकेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

असा होतो हल्ला..

सायबर हल्ले करण्यापूर्वी संकेतस्थळांची तपासणी करण्यात येते. ज्या संकेतस्थळांची सुरक्षा भेदणे तुलनेने सोपे असते, अशा संकेतस्थळांवर एकाच वेळी हल्ला करण्यात येतो. त्यांचे नियंत्रण मिळवण्यात येते. याप्रकरणी ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सीईआरटी) यांच्यासह समन्वय ठेवून पोलीस तपास करत आहेत. इतर सरकारी यंत्रणांनाही त्यांच्या संकेतस्थळांच्या सुरक्षेची पडताळणी करण्यास सांगण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.