scorecardresearch

मुंबईत वेगाचा रोमांचकारी थरार; ‘रेड बुल शो रन’चा उत्साह

नेहमीच घडय़ाळाच्या काटय़ांवर धावणाऱ्या मुंबईकरांनी तब्बल १४ वर्षांनंतर रविवारी ‘फॉम्र्युला वन’ कारचा वेगवान थरार अनुभवला.

formula 1 racing car

नेहमीच घडय़ाळाच्या काटय़ांवर धावणाऱ्या मुंबईकरांनी तब्बल १४ वर्षांनंतर रविवारी ‘फॉम्र्युला वन’ कारचा वेगवान थरार अनुभवला. ‘रेड बुल इंडिया’ आणि ‘ओरॅकल रेड बुल रेसिंग’ यांच्यातर्फे वांद्रयातील बॅण्ड स्टॅण्डच्या रस्त्यांवर ‘रेड बुल शो रन’चे आयोजन करण्यात आले होते. फॉम्र्युला वन ग्रँड प्रिक्स तब्बल १३ वेळा जिंकणारा दिग्गज रेसर डेव्हिड कौल्थर्ड याने आरबी सेव्हन ही फॉम्र्युला वन कार चालविली.

भाजपच्या खासदार पूनम महाजन आणि आमदार आशीष शेलार यांच्या उपस्थितीत ‘शो रन’ची सुरुवात करण्यात आली. बॅण्ड स्टॅण्डवरील अभिनेता सलमान खान याच्या गॅलॅक्सी इमारतीपासून ते रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला, अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्यापर्यंत, डेव्हिडने दोन ते तीन वेळा आरबी सेव्हन ही फॉम्र्युला वन कार सुसाट वेगात चालविली. यावेळी त्याने आरबी सेव्हनच्या इंजिनचे फायिरग (जोरदार आवाज) केले आणि ही फॉम्र्युला वन कार गोलाकार फिरवली. यावेळी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

‘बॅण्ड स्टॅण्डच्या रस्त्यांवर आरबी सेव्हन ही फॉम्र्युला वन कार चालविण्याचा, माझा अनुभव हा खूप छान होता. तुम्ही सगळेजण ही शो रन पाहण्यासाठी आवर्जून आलात, त्याबद्दल खूप खूप आभार’, अशा भावना यावेळी डेव्हिड कौल्थर्ड याने व्यक्त केल्या.यापूर्वी २००९ ला डेव्हिड कौल्थर्ड ‘शो रन’साठी मुंबईत आला होता आणि तेव्हा मुंबईकरांनी वांद्रे – वरळी सागरी सेतूवर फॉम्र्युला वन कारचा रोमांचकारी थरार अनुभवला होता.

यंदाच्या ‘शो रन’ दरम्यान सुपर कार क्लबतर्फे निरनिराळय़ा महागडय़ा चारचाकी गाडय़ांचे आणि इंडिया बाईक विकतर्फे सुपर बाइक्सचे संचलन करण्यात आले. तर, प्रसिद्ध फ्री स्टाईल स्टंट राइडर अरास गिबिझा याने केटीएम ७९० ही सुपर बाईक चालवीत थरारक प्रात्यक्षिके दाखविली.
आरबी सेव्हन या फॉम्र्युला वन कारचा थरार अनुभवण्यासाठी तरुणाईने सकाळी आठ वाजल्यापासूनच बॅण्ड स्टॅण्डवर हजेरी लावण्यास सुरुवात केली होती आणि अवघ्या काही क्षणांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू भरून गेल्या.

डेव्हिडच्या नावाचा गजर..
रेसर डेव्हिड कौल्थर्ड याचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थितांकडून सातत्याने डेव्हिडच्या नावाचा गजर केला जात होता. उन्हाच्या झळा अंगावर झेलत आणि गर्दीतून हात वर करीत, हा क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. या कार्यक्रमाच्या अखेरीस डेव्हिड कौल्थर्ड याने भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन, सर्वाना अभिवादन केले.

आरबी सेव्हन या फॉम्र्युला वन कारची वैशिष्टय़े डेव्हिड कौल्थर्ड याने बॅण्ड स्टॅण्डच्या रस्त्यांवर २०११ मध्ये फॉम्र्युला वन चॅम्पियनशिप विजेती आरबी सेव्हन ही गाडी चालविली. या गाडीचे इंजिन हे रेनॉल्ट २४०० सीसी व्ही८ स्वरूपाचे आहे, जी ७५० हॉर्सपॉवर आणि १८,००० रोटेशन्स तयार करते. या कारचे चालकासह तब्बल ६४० किलो वजन आहे. ही आतापर्यंतची सर्वात प्रभावी फॉम्र्युला वन कार मानली जाते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 03:00 IST