मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील वाहनावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने बाराव्या आरोपीला अटक केली आहे. अमर सुरेंद्र मुंडिया असे त्याचे नाव असून हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा येथून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या बँक खात्यातून या प्रकरणातील अन्य आरोपींच्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित झाल्याचे तपासात समोर आले आहे. या आर्थिक व्यवहारांचा स्रोत आणि त्यासाठी वापरण्यात आलेली डिजिटल साधने शोधण्यासाठी विशेष महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) न्यायालयाने शनिवारी मुंडिया याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी हरियाणा पोलिसांच्या मदतीने मुंडिया याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यासाठी न्यायालयाकडून तीन दिवसांची पारगमन कोठडी मिळविण्यात आली. शनिवारी त्याला विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांनी न्यायालयात त्याच्या कोठडीची मागणी केली. मुंडिया याच्या बँक खात्यातून सहआरोपींच्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्यात आले असून या रकमेचा स्रोत शोधणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, पैसे हस्तांतरित करण्यासाठी कोणते भ्रमणध्वनी किंवा अन्य डिजिटल माध्यमे वापरण्यात आली, याची माहिती मिळवायची असल्याचेही स्पष्ट केले.
या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची साखळी तपासाचा महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वीच्या तपासात रोहणा गावातील सहआरोपी कुणाल याने मुंडिया याच्या बँक खात्यात ४० हजार रुपये जमा केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुंडिया याच्या खात्यातून अन्य आरोपी राधा हिच्या खात्यात १२ हजार रुपये हस्तांतरित झाल्याचा तपशीलही तपासात पुढे आला आहे. हे व्यवहार नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, त्यातील रकमेचा वापर गुन्ह्याच्या नियोजनासाठी किंवा अंमलबजावणीसाठी झाला का, याचा तपास सुरू आहे. गोळीबारानंतर हल्लेखोरांच्या पळून जाण्यासाठी वापरलेल्या दुचाकीची खरेदी तसेच हॉटेलमधील मुक्काम आणि अन्य खर्चांसाठी या पैशांचा वापर झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
यापूर्वी अटक केलेल्या अकरा आरोपींनाही विशेष न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी अनिल पंडित याचा शोधही सुरू आहे. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. गोळीबारानंतर समाजमाध्यमांवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. पंडित आणि अटक केलेल्या आरोपींचे संबंध, कथित गुन्हेगारी टोळीतील त्यांची भूमिका आणि हल्ल्यामागील व्यापक कटाचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
