मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाहनावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली असून, या प्रकरणातील आरोपींची संख्या १२ वर पोहोचली आहे. अमन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा तालुक्यातील रोहणा गावातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बँक खात्यात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या व्यवहारांचा गोळीबाराच्या कटाशी संबंध आहे का, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
जुहू परिसरात १८ ऑक्टोबरला टायगर श्रॉफ याच्या वाहनावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात यापूर्वी ११ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपी कुणाल जामिनसिंग याने अमनच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचे निष्पन्न झाले. तसेच अन्य काही खात्यांतून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे व्यवहार झाल्याची माहितीही तपासात उघडकीस आली आहे. या व्यवहारांचा उद्देश व पैशांचा अंतिम वापर शोधण्यावर पोलिसांचा भर आहे.
अमन हा कुणालच्या संपर्कात होता. कुणालने त्याच्या खात्यात जमा केलेली रक्कम पुढे काढून अन्य आरोपींपर्यंत पोहोचवली का, तसेच या पैशांचा वापर गोळीबारासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे मिळवण्यासाठी झाला का, याची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील कथित सूत्रधार अनिल पंडित याच्याकडूनही अमनच्या खात्यात पैसे आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. मात्र, या आर्थिक व्यवहारांचा नेमका संबंध आणि अमनची भूमिका चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, गुरुवारी विशेष मोक्का न्यायालयाने यापूर्वी अटक केलेल्या ११ आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कथित कटातील प्रत्येकाची भूमिका, शस्त्रांचा पुरवठा, आर्थिक व्यवहार आणि आरोपींमधील संपर्क साखळी तपासण्यासाठी अधिक चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. अमनला शुक्रवारी न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
