आयुष्यात येणाऱ्या असंख्य घटनांना तोंड कसं द्यायचं, याची लिखापढी कुठेच नसते. ज्याच्या त्याच्या वाट्याला येणारं दु:ख वेगळं आणि त्याला सामोरं जाण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. मग दु:खच नुसतं पडद्यावर मांडण्यापेक्षा ते ज्यांच्यावर बेतलं आहे, त्यांची त्या त्या प्रसंगातली अवस्था कशी असेल? काय विचार केला असेल एखादा निर्णय घेताना… तोही घेणं जमलं असेल का? की आल्या क्षणांना खमकेपणानं सामोरं जाणं एवढंच केलं असेल… इतक्या प्रामाणिकपणे एखादी गोष्ट पडद्यावर सांगण्याचा प्रयत्न करणारा आणि त्यातही सगळ्याच अर्थाने स्त्रियांना ताठ कण्याने जगा म्हणणारा चित्रपट म्हणून ‘तिघी’ खास आहे.

आई आणि तिच्या दोन मुलींची गोष्ट जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपटात पाहायला मिळते. मुंबईत काम करणारी स्वाती आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेली आहे. तिच्या नवऱ्याच्या व्यवसायातील चढउतारामुळे त्यांच्यावर कर्ज आहे. स्वातीला ती ज्या कंपनीत काम करते त्या साहेबाने आर्थिक मदत केली आहे, त्यामुळे या कर्जाचं आणि परिणामी साहेबाच्या भीतीचं भूत तिच्या मानगुटीवर बसलं आहे. त्याचवेळी तिला आई आजारी असल्याची बातमी कळते आणि ती पुण्याला घरी येते. या एका क्षणी स्वाती, सारिका आणि त्यांची आई हेमा या तिघी पुन्हा एकत्र येतात. आणि मधल्या काही वर्षांतला दुरावा, अबोला, राग, माया सगळंच उफाळून येतं. सारिका गेली काही वर्षं एकटी आईला सांभाळते आहे, त्यामुळे तिला वैयक्तिक आयुष्यच उरलेलं नाही, हा सल आणि साहजिकच स्वातीबद्दलचा राग तिच्या मनात आहे. मात्र, अशा क्षणी या दोघी बहिणी एकत्र आल्या आहेत जेव्हा त्यांना त्यांच्या आईच्या आजारपणाविषयी कळलं आहे. आजार वाढत चालला आहे, तसं मूळची खंबीर असलेली आई आणखीनच दृढ मनाने काही निर्णय घेते. त्या क्षणांमध्ये आईबरोबर असणं, तिच्या निर्णयाबद्दल विचार करणं आणि स्वत:समोरचे प्रश्न सोडवणं या प्रक्रियेतून जाताना तिघींमधलं नातं पुन्हा एकदा खुलून येतं. या तिघींमधल्या त्या हळव्या क्षणांचे, त्यांच्यातल्या नात्याचे आणि नात्यांमधल्या गुंतागुंतीचे साक्षीदार होऊन तो प्रवास अनुभवणं म्हणजे हा चित्रपट.

‘तिघी’ हा दिग्दर्शिका जीजिविषा काळे हिचा पदार्पणाचा चित्रपट आहे, मात्र पहिलेपण कुठेही जाणवणार नाही इतक्या सुंदर आणि नेमकेपणाने तिने या चित्रपटाची मांडणी केली आहे. चित्रपट उत्तम होण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सगळ्या बाबींवर घेतलेली मेहनत चित्रपटात दिसून येते. जीजिविषाच्या या कथेला पटकथेचं रूप देण्याची जबाबदारी निखिल महाजनसारख्या अनुभवी दिग्दर्शकाने सांभाळली आहे. त्यामुळे रसभरीत अशी कथा नसतानाही पटकथा अशा पद्धतीने लिहिली गेली आहे की, बऱ्यापैकी शेवटपर्यंत उत्सुकता वाढत जाते आणि मग अनपेक्षित असं एक वळण कथेला मिळतं. दोन बहिणींमधली भांडणं, आईचं त्या दोघींना सुनावणं, पुण्यातलं बंगलेवजा घर, घरातला आणि घराबाहेरचाही माणसांचा वावर, त्यांचे कपडे, त्यांचं दिसणं, त्यांचं बोलणं-वागणं सगळ्यात एक प्रामाणिकपणा आहे. वास्तवात जसं घडलं असतं तसंच ते पडद्यावर मांडण्याची ही असोशी असल्याने प्रेक्षक सहजपणे त्या गोष्टीशी स्वत:ला जोडून घेतो. यात खूप महत्त्वाचा विषय दिग्दर्शिकेने हाताळला आहे आणि ते करत असतानाही स्त्रियांची त्यातली भूमिका ही अधिक महत्त्वाची ठरते हे विशेष.

सशक्त पटकथा, प्रगल्भ मांडणीला कलाकारांच्या अभिनयाने वेगळीच उंची मिळाली आहे. भारती आचरेकरांनी खूप छान पद्धतीने खंबीर अशी आई रंगवली आहे. तिने आयुष्यात स्वत: निर्णय घेऊन दोन्ही मुलींना एकटीने वाढवलं आहे. आणि ज्या ताठ कण्याने ती जगली, तसंच तिच्या दोन्ही मुलींनीही जगावं हे तिचं म्हणणं रास्तही आहे आणि गरजेचंही आहे. हे मूळचं खमकेपण, निरोपाची वेळ हळूहळू जवळ येत चालली आहे हे जाणवल्यावर येणारी अस्वस्थता, स्वत:शीच वाढलेला संवाद आणि जातानाही आपल्यातला धीर खचू नये म्हणून सतत निर्धाराने जगण्याची धडपड या सगळ्या भावछटा भारती आचरेकरांनी कमालीच्या सहजतेने रंगवल्या आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यात छोटी बहीण सारिकाची भूमिका केली आहे. स्वातीच्या तुलनेत सारिकाच्या आयुष्यातील नेमक्या समस्या तितक्या ठळकपणे येत नाहीत. मात्र, एकाच वेळी अलिप्त राहणारी आणि त्याचक्षणी आतून निखळ प्रेमाने भरलेली अशी सारिका सोनालीच्या रूपात पाहणं हा उत्तम अनुभव आहे. कुठल्याही रंगभूषेचा आधार न घेता सहज, ती जशी आहे तशी या भूमिकेत वावरली आहे. नेहा पेंडसेने स्वातीची सगळ्या बाजूने झालेली कुचंबणा संयतपणे रंगवली आहे. या तिघींमधलं नात्याचं रसायन अनुभवणं ही चित्रपटाची खरी गंमत आहे. सारिकाच्या मित्राच्या छोटेखानी भूमिकेत निपुण धर्माधिकारीचा प्रसन्न वावर सुखावणारा आहे. पुष्कराजला त्यामानाने फार काही करण्यासारखं नसलं तरी त्याच्या वाट्याला आलेली भूमिका त्याने उत्तम निभावली आहे. संजय मोने आणि सुव्रत जोशी दोघांचीही भूमिका महत्त्वाची आणि न बोलता बरंच काही सांगून जाणारी… अभिनेता जितेंद्र जोशी याने लिहिलेलं ‘हास जराशी’ या अर्थपूर्ण गीताला मोजक्याच सुरावटींसह सोनू निगमच्या आवाजात उतरवणाऱ्या अद्वैत नेमळेकरचं संगीत, पावसाळ्यातलं कुंद वातावरण अवघ्या चित्रपटभर जाणवत राहावं इतक्या सुंदरपणे टिपणारा मिलिंद जोग यांचा कॅमेरा, प्राजक्त देशमुखने लिहिलेले संवाद अशा खूप चांगल्या बाबी या चित्रपटाच्या बाबतीत सुरेख जुळून आल्या आहेत. जाणीवपूर्वक वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न म्हणून ‘तिघी’ हा निखळ भावप्रयोग आहे.

तिघी दिग्दर्शक – जीजिविषा काळे

कलाकार – भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, संजय मोने.