मुंबई: राज्यामध्ये येत्या काही दिवसांत आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, इस्टर संडे, रमझान ईद असे विविध धर्मियांचे सण साजरे होणार आहेत. हे सण शांततेत पार पडावेत, यासाठी राज्यभर दोन लाख पोलीस व ३८ हजार होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस आणि होमगार्डबरोबरच राज्य राखीव पोलीस दलाच्या १०० कंपन्या विविध संवेदनशील आणि महत्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आगामी साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांच्या कालावधीमध्ये सराईत व अभिलेखावरील गुन्हेगार, जातीय सलोखा बिघडवणाऱ्या उपद्रवी व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सर्व पोलीस घटकांमधील कार्यरत मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी व संबंधित मंडळाचे सदस्य यांच्या बैठका आयोजित करून त्याद्वारे परिसरातील नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांना, समाज माध्यमांद्वारे प्रसिध्द केलेल्या पोस्टला बळी पडून धार्मिक तेढ वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच अशा धार्मिक भावना भडकाविणाऱ्या व्यक्तींची माहिती तात्काळ पोलीसांना देण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिसांचे पथ संचालन आयोजित करण्यात आलेले आहेत.

मुंबईतही चोख बंदोबस्त

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी शहरात पथ संकलन करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. राजकीय व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मुंबईतील पोलिसांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द..

४ मेपर्यंत सर्व पोलिसांना सुटीवर न जाण्याचे आदेश देण्यात आले असून दंगल नियंत्रण पथक, राखीव पोलीस यांना सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व मोहल्ला कमिटीसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस ठाण्यात किमान १५ अंमलदार तरी उपस्थित राहतील याची काळजी घेण्यास सांगितले आहे. त्याशिवाय परिसरात कोणत्याही ठिकाणी अप्रिय घटना घडल्यास पाच मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. मिल्स स्पेशन व एसीटी कक्षातील पोलिसांना परिसरातील हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.