मुंबईसह देशात खळबळ उडवून देणाऱ्या शीना बोरा या तरुणीच्या हत्या प्रकरणाचे गूढ अद्यापि कायम आहे. शीना बोरा इंद्राणीच्या पहिल्या पतीपासूनची मुलगी असल्याची माहिती उघड झाली असली तरी ती इंद्राणीच्याच एका निकटच्या नातेवाईकाकडून झालेली मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा चौकशीतून पुढे आला आहे. मात्र अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे शीनाचे खरे पिता कोण, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शीना बोरा या तरुणीच्या अटकेप्रकरणी ‘आयएनएक्स’ मीडियाची माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्राणी बोरा हिच्यासह तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय याला खार पोलिसांनी अटक केली आहे. संजीव खन्ना याचा कोलकाता येथील न्यायालयातून ट्रांझिट रिमांड मिळाला असून त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. खुद्द पोलीस आयुक्त राकेश मारिया खार पोलीस ठाण्यात आरोपींची चौकशी करत आहेत.
दरम्यान, शीनाचा प्रियकर आणि सावत्र भाऊ राहुल मुखर्जी याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडेही चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक गुवाहाटीला रवाना झाले असून त्यांनी शीनाचा भाऊ मिखाईल बोरा याचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. विशेष म्हणजे शीना बेपत्ता असल्यापासून अद्याप हत्येच्या नेमक्या कारणांचा उलगडा झालेला नाही. पोलिसांनी इंद्राणीचे पारपत्र, दोन भ्रमणध्वनी, दोन लॅपटॉप जप्त केले असून त्यातून माहिती गोळा करण्यात येत आहे.
हत्येपूर्वी गुंगीचे इंजेक्शन
२४ एप्रिल २०१२ रोजी वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाजवळून शीनाचे अपहरण करण्यात आले होते. गाडीत वाहनचालक श्याम राय, संजीव खन्ना होते. गळा दाबून हत्या करण्यापूर्वी त्यांनी शीनाला गुंगीचे इंजेक्शनही दिले होते. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून गाडीतच रात्रभर ठेवला. दुसऱ्या दिवशी पेण येथील जंगलात सुटकेस फेकून जाळून टाकण्यात आली होती.
पुरावे मिळविण्यात भर
पेण पोलिसांनी मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली; पण पोलिसांचा भर पुरावे गोळा करण्यावर आहे. ज्या दिवशी शीनाचे अपहरण झाले त्या दिवशी पोलिसांनी सर्वाचे मोबाइल टॉवर लोकेशन तपासले. ते सर्व एकाच ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
बेपत्ता असल्याची तक्रार नाही
२४ एप्रिल २०१२ पासून शीना बेपत्ता होती. खार पोलिसांकडे मी याबाबत तक्रार द्यायला गेलो. त्यांनी शीनाच्या आईकडे चौकशी केली. शीना अमेरिकेत गेल्याचे तिने सांगितले आणि हा तपास थांबला, असे शीनाचा प्रियकर आणि सावत्र भाऊ राहुल मुखर्जीने पोलिसांना सांगितले.

’इंद्राणीने सुरुवातीला शीना बहीण असल्याचे सांगितले होते. नंतर ती मुलगी असल्याचे उघड झाले.
’ शीनाचा पिता नक्की कोण हे समजत नव्हते.
’इंद्राणी अल्पवयीन असताना तिच्याच एका जवळच्या नातेवाईकापासून शिनाचा जन्म झाल्याचा धक्कादायक खुलासा सूत्रांनी केला आहे.