मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील दिवा – सावंतवाडी रेल्वेगाडीच्या रोहा स्थानकातील वेळेत बदल करण्याची कोकण विकास समितीची मागणी मान्य करण्यात आली असून मध्य रेल्वे प्रशासनाने रोहा स्थानकावर येणाऱ्या दिवा – सावंतवाडी आणि सावंतवाडी – दिवा एक्स्प्रेसच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहादरम्यान मध्य आणि कोकण रेल्वेची हद्द असल्याने रोहा स्थानकाच्या आधी संबंधित रेल्वेकडून सर्व रेल्वेगाड्यांना थोडा जास्तीचा वेळ घेतला जातो. या रेल्वे गाड्यांना त्या-त्या विभागाच्या हद्दीत होणारा उशीर सामावून घेण्यासाठी ही वाढीव वेळ उपयोगी ठरते. परंतु रेल्वेगाड्या वेळेवर आल्यास व त्यांना रोहा येथे थांबा असल्यास रेल्वेगाड्यांना तेथून सुटण्याची वेळ होईपर्यंत थांबावे लागते.
त्यानुसार गाडी क्रमांक १०१०५ दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस, गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर या गाड्या रोहा स्थानकात निर्धारित वेळेच्या २० ते ३० मिनिटे आधी पोहोचतात. त्यामुळे या गाड्यांना तेथे थांबावे लागते. तसेच त्या ठिकाणी जास्त वेळ गेल्यानंतर मागून एखादी जलद रेल्वेगाडी आल्यास ती पुढे काढण्यासाठी आणखी वेळ थांबावे लागते. त्यामुळे प्रवाशांना रखडावे लागते. ही बाब लक्षात घेऊन याबाबत कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर व सदस्य अक्षय महापदी यांनी ११ डिसेंबर २०२५ रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना पत्र पाठवले.
या पत्राची दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने १ जानेवारीपासून गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजरची रोहा स्थानकातील वेळ सकाळी १०.५५ ऐवजी सकाळी १०.४५, तर, १२ जानेवारीपासून गाडी क्रमांक १०१०५ दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसची वेळ सकाळी ९ ऐवजी सकाळी ८.५० वाजता आणि गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्स्प्रेसची वेळ सायंकाळी ५.२० ऐवजी सायंकाळी ५.०५ वाजता केली. यामुळे निर्धारित वेळेत धावणाऱ्या या रेल्वेगाड्यांना रोहा स्थानकात लवकर पोहचल्यास विनाकारण जास्त वेळ थांबावे लागणार नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
रोह्यातून वेळेत सुटलेली गाडी पुढील स्थानकांवर लवकर पोहोचून थांबून राहू नये, म्हणून आता कोकण रेल्वेला गाडी क्रमांक १०१०५ दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसच्या कोलाड ते विन्हेरे स्थानकांतील वेळही १५ मिनिटे लवकर करावी. तसेच सर्वच स्थानकांतील वेळ मागे घेणे आवश्यक आहे. अन्यथा रोह्याच्या पुढील थांब्यावर रेल्वेगाडी लवकर पोहोचून उभी करावी लागेल. तसेच दोन्ही दिशांना मध्य रेल्वेवरील नागोठणे, निळजे आणि तळोजे येथील थांबे पूर्ववत करावेत. या रेल्वेगाडीला एक्स्प्रेस करून काही फायदा झाला नाही. एकूण प्रवास वेळेत किमान एक तासाची घट होणार नसेल, तर थांबे पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी केली आहे.
रोहा स्थानकावर एक्सप्रेसच्या वेळेत सुधारणा
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारीपासून १०१०५ दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेस रोहा येथे सकाळी ८.५० वाजता होपोचेल. गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्स्प्रेस रोहा येथे सायंकाळी ५.०५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाड्यांना रोहा स्थानकात ५ मिनिटे थांबा असेल.
