मुंबई : दिल्ली विद्यापीठाचे दिवंगत प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या उमर खालिद व शरजील इमाम यांच्या सुटकेच्या मागणीसाठी संस्थेच्या आवारात अनधिकृत सभा घेऊन प्रक्षोभक घोषणा देण्याच्या आरोपाप्रकरणी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा (टिस) माजी विद्यार्थी कामाख्या दास (२३) याने अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली.

सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, कामाख्या याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबलकर यांच्या एकलपीठापुढे त्याच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. प्रा. जी. एन. साईबाबा यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ””टिस`च्या आवारामध्ये आयोजित एका कार्यक्रमात खालिद आणि इमाम यांच्या समर्थनार्थ या घोषणा देण्यात आल्या होत्या.

दास आणि ””टिस`च्या इतर विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये १० ते १२ विद्यार्थ्यांनी परवानगीशिवाय वसतिगृहाजवळ एकत्र येऊन मेणबत्त्या पेटवून, कविता वाचून आणि प्रक्षोभक घोषणा देऊन साईबाबांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर, या तक्रारीच्या आधारे दास आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याने आक्षेपार्ह घोषणा दिल्या नाहीत, असा दावा दास याने याचिकेत केला आहे.

दरम्यान, नक्षलवादाशी संबंधित एका प्रकरणात मृत्यूपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या साईबाबा यांना श्रद्धांजली वाहणे बेकायदेशीर नसले तरी, शैक्षणिक संस्थेच्या आवारात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल असलेल्या आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तींच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे आरोपींच्या वर्तनाबद्दल संशय निर्माण करते, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने दास याच्यासह अभिरूप पॉल या दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन नाकारताना नमूद केले होते.

सामान्यतः मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहताना “रेस्ट इन पीस ” यासारखे शब्दप्रयोग केले जातात. परंतु आरोपी विद्यार्थ्यांनी कथितरीत्या “रेस्ट इन पॉवर ” हे शब्द वापरले. ही कृती आणि त्यांच्याकडे सापडलेले साहित्य त्यांच्या वर्तनाबद्दल निश्चितपणे संशय निर्माण करते, असेही न्यायालयाने दास आणि पॉल यांना दिलासा नाकारताना स्पष्ट केले होते.