मुंबई : ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’चा (टीस) ८६वा वार्षिक दीक्षांत समारंभ २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार असल्याची घोषणा संस्थेने केली आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. हा दीक्षांत समारंभ २ ऑगस्ट रोजी होणार होता. मात्र, काही कारणास्तव अचानक तो रद्द करण्यात आला.

टीसच्या दीक्षांत समारंभाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रशासनाकडून अचानक समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे २ ऑगस्ट रोजी होणारा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला. मात्र, आता टीस प्रशासनाने २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मुंबईतील नौरोजी कॅम्पसमधील कन्व्हेन्शन सेंटर येथे दीक्षांत समारंभ होणार असल्याचे जाहीर केले आहे.

यासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे कळविण्यात आली आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना ७ ऑगस्टपर्यंत उपस्थितीची माहिती कळविण्यास सांगितले आहे. समारंभाचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असून, विविध शैक्षणिक विभागांच्या सचिवालयांना पदवीधर विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या उपस्थितीची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टीआयएसएसचा दीक्षांत समारंभ २ ऑगस्ट रोजी नियोजित होता. मात्र, कार्यक्रमाच्या केवळ दोन दिवस आधी ‘अनपेक्षित कारणां’मुळे तो रद्द करण्यात आला होता. त्यावेळी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. आता २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे कोण असतील, याबाबत मात्र संस्थेने अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.

दरम्यान, समारंभ रद्द झाल्यामुळे आर्थिक फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी टीसने ३१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या प्रवास खर्चाचा परतावा देण्याची घोषणाही केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार असून, त्यांना मूळ प्रवास तिकिटे, बोर्डिंग पास, बिले आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. ज्यांनी प्रवास रद्द केला होता, त्यांनी रद्द झालेल्या ये-जा तिकिटांच्या मूळ प्रतीही जमा कराव्यात, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

प्रवास खर्च परताव्याची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व शैक्षणिक सचिवालयांना विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारून त्यांची नोंद ठेवण्याच्या तसेच ती शैक्षणिक कार्यालयामार्फत वित्त व लेखा विभागाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व कागदपत्रे १० ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, लेखापरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खर्चाचा परतावा करण्यात येणार आहे.

मुंबईत आधीच दाखल झालेल्या वा प्रवास व निवासासाठी खर्च केलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबियांची मोठी गैरसोय झाली होती. प्रवासखर्चाच्या भरपाई निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल.