मुंबई : बदलती जीवनशैली व कामाचा वाढता ताण यामुळे ३० वर्षांवरील तरुणांमध्ये मानसिक ताण-तणाव व नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याने विविध संशोधनातून पुढे आले आले आहे. मात्र मानसिक तणावासंदर्भात नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी सुरू केलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (टीस) आय-कॉल प्रकल्पाअंतर्गत चॅम्प्स हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर १२ ते २५ वयाेगटातील मुलांकडून अधिक दूरध्वनी येत आहेत. या मुलांकडून भावनिक तणाव, स्व – हानी, शिक्षण आणि करियर आणि हिंसाचार यासंदर्भात अधिक दूरध्वनी येत आहेत.

देशभरातील मुले व किशोरवयीन मुलांच्या मानसिक व भावनिक आरोग्यासाठी आय-कॉल, टाटा समाजविज्ञान संस्थेच्या माध्यमातून आणि युनिसेफच्या सहकार्याने चॅम्प्स हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २७ हजार ७०६ जणांनी दूरध्वनी करून मदत घेतली. यामध्ये ७ ते २५ वयोगटातील १२ हजार ४५८, तर २६ वर्षावरील १५ हजार २४८ जणांनी दूरध्वनी केले आहेत.

यामध्ये ७ ते ११ वयोगटातील ९ मुलांनी दूरध्वीन केला आहे. तर १२ ते १८ वयाेगटातील ५ हजार ११६ मुलांनी दूरध्वनी केले आहेत. यामध्ये ४ हजार ६६४ मुले, तर ४५२ मुलींचा समावेश आहे. १९ ते २५ वयोगटातील ७ हजार ३३३ मुलांनी दूरध्वनी केले आहेत. यामध्ये ६ हजार ५६२ मुले, ७५८ मुली आणि १३ तृतीयपंथीय मुलांचा समावेश आहे. मुलांनी केलेल्या दूरध्वनीमध्ये सर्वाधिक ३९.३७ टक्के दूरध्वनी भावनिक तणावासाठी होते. याखालोखाल स्व-हानी (९.७९ टक्के), नातेसंबंधांतील अडचणी (५.६८ टक्के), आत्महत्येचे विचार (३.४० टक्के), हिंसाचार (३.३२ टक्के) आणि शिक्षण व करिअरविषयक चिंता (३.०५ टक्के) यासाठी दूरध्वनी करण्यात आले होते.

आय-कॉल ही सेवा २०१२ पासून सुरू करण्यात आली. त्यानंतर २०२३ मध्ये चॅम्प्स आणि री-यू या दोन सेवा सुरू करण्यात आल्या. या सेवांवर आम्हाला मिळणारा प्रतिसाद चिंतेचा विषय आहे. स्व-हानीचा विषय भारतात अद्यापही संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या क्षेत्रात अधिक सखोल अभ्यासाची गरज असल्याचे टीआयएसएसच्या स्कूल ऑफ ह्यूमन इकॉलॉजीच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. अपर्णा जोशी यांनी सांगितले.

‘री-यू’च्या सेवेतही वाढ

आय-कॉलच्या ‘री-यू’ या युवकांसाठीच्या चॅट-आधारित आत्महत्या प्रतिबंध सेवेतही वाढ नोंदविण्यात आली आहे. या सेवेमधील सरासरी मासिक सत्रांमध्ये २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च २०२३ मध्ये सुरू झाल्यापासून री-यू चॅट-लाइनने एकूण १० हजार ३८७ सत्रांद्वारे मदत पुरवली आहे. त्यातील २१.५ टक्के सत्रे ही ‘आणीबाणी’ स्वरूपाची होती. या आणीबाणीच्या संवादांमध्ये ४१ टक्के युवकांनी आत्महत्येच्या विचारांसाठी मदत मागितली, तर नॉन-क्रायसिस सत्रांमध्ये भावनिक तणाव (२३ टक्के) हा प्रमुख मुद्दा ठरला आहे.

हिंदी भाषक विद्यार्थ्यांचे सर्वाधिक दूरध्वनी

बहुभाषिक सेवा उपलब्ध असतानाही, हेल्पलाईनवर आलेल्या तब्बल ९५.३ टक्के दूरध्वनीवरून हिंदी भाषेत संवाद साधण्यात आला होता. २५ वर्षांखालील वयोगटातील दूरध्वनीपैकी बहुतांश मुलांनी स्वतःसाठी मदत मागितली. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

स्व-हानी किंवा नॉन-सुइसाइडल सेल्फ इंज्युरी ही विशेषतः किशोरवयीन व तरुणांमध्ये वाढती चिंता ठरत आहे. स्वहानी ही अनेकदा आत्महत्येच्या उद्देशाने नसते. ती आयुष्यातील ताण, तीव्र भावना आणि वेदना हाताळण्यातील अडचणींमुळे केली जाते. काही वेळा ही भावना व्यक्त करण्याची किंवा मनात दडलेल्या वेदना बाहेर काढण्याची पद्धत असते. तरुणांना अधिक सकारात्मक व उपयुक्त सामना करण्याच्या पद्धती शोधण्यासाठी आधार देणे आवश्यक आहे. – प्रा. डॉ. अपर्णा जोशी, सहाय्यक प्राध्यापक. स्कूल ऑफ ह्युमन इकॉलॉजी (टीस)