मुंबई : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या उमर खालिद व शरजील इमाम यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या घोषणा देण्यासाठी कॅम्पसमध्ये अनधिकृत सभा घेतल्याप्रकरणी फौजदारी खटल्यांचा सामना करणाऱ्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (टीस) दोन विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन नाकारला. त्याचवेळी इतर सात विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी हा निर्णय दिला. नक्षलवादाशी संबंधित एका प्रकरणात मृत्यूपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या साईबाबा यांना श्रद्धांजली वाहणे बेकायदेशीर नसले तरी, शैक्षणिक संस्थेच्या आवारात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल असलेल्या आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तींच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे आरोपींच्या वर्तनाबद्दल संशय निर्माण करते, असे निरीक्षण न्यायालयाने दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन नाकारताना नमूद केले.

सामान्यतः मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहताना ‘रेस्ट इन पीस’ यासारखे शब्दप्रयोग केले जातात. परंतु आरोपी विद्यार्थ्यांनी कथितरीत्या ‘रेस्ट इन पॉवर’ हे शब्द वापरले. ही कृती आणि त्यांच्याकडे सापडलेले साहित्य त्यांच्या वर्तनाबद्दल निश्चितपणे संशय निर्माण करते, असेही न्यायालयाने कामाख्या दास (२३) आणि अभिरूप पॉल (३२) यांना दिलासा नाकारताना स्पष्ट केले.

न्यायालयाने उत्कर्ष खुंटिया, यश कौंडिल्य, अवंतिका, इशप्रीत कौर, निकिता मोनिका डिसूझा, हार्डिका भगत आणि सत्यम यादव या सात विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यांनी तपासात सहकार्य केल्यामुळे त्यांची पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक नव्हती, असे न्यायालयाने त्यांना दिलासा देताना म्हटले.