मुंबई : ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’चा (टिस) माजी विद्यार्थी कामाख्या दास (२३) याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अटकेपासून अंतरिम दिलासा दिला. दिल्ली विद्यापीठाचे दिवंगत प्राध्यापक जी. एन. साईबाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या उमर खालिद व शरजील इमाम यांच्या सुटकेच्या मागणीसाठी संस्थेच्या आवारात अनधिकृत सभा घेऊन प्रक्षोभक घोषणा दिल्याचा आरोप दास याच्यावर आहे.
आरोपांचे स्वरूप आणि याचिकाकर्त्यांचा मोबाईल फोन व लॅपटॉप आधीच जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे, या टप्प्यावर त्याला कोठडीत घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबालकर यांच्या एकलपीठाने दास याला अटकेपासून संरक्षण देताना स्पष्ट केले. तसेच, ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत दास याला बोलावले जाईल तेव्हा त्याने संबंधित पोलीस ठाण्यात आणि तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, दास याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तत्पूर्वी, दास याने तपासात सहकार्य केले असून त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. केवळ एखाद्या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित राहणे किंवा ‘रेस्ट इन पॉवर’सारखे शब्दप्रयोग करणे हा गुन्हा नसल्याचा युक्तिवाद दास याच्या वतीने युक्तिवाद करताना वरिष्ठ वकील मिहीर देसाई यांनी केला. याशिवाय, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या नऊपैकी सात विद्यार्थ्यांना आधीच अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. जेन-झी तरुण थोडे तापट स्वभावाचे असतात आणि कधीकधी अशा गोष्टी बोलून जातात ज्याचा अर्थ त्यांना पूर्णपणे समजलेला असतोच असे नाही. त्यासाठी त्यांना तुरुंगात डांबावे का ? असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला. तसेच, दास याचे शिक्षण पूर्ण झाले असून त्याला नोकरीही मिळाली आहे आणि तपास यंत्रणेसमोर पाचवेळा हजर राहिल्याचेही देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.
दुसरीकडे, तपासादरम्यान फुटीरतावादाशी संबंधित एक खोलवर कट रचल्याचे उघड झाल्याचा दावा मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केला आणि दास याच्या याचिकेला विरोध केला. न्यायवैद्यक तपासणीत डिलिट केलेले ॲप्लिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य सापडले आहे, त्यात फुटीरतावाद, खलिस्तान आणि बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) विचारसरणीचा पुरस्कार केल्याचे दिसून आले आहे, असा दावा देखील हिरे यांनी केला.
