मुंबई : मध्य रेल्वेवरील टिटवाळा स्थानकावर १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. १५ दिवसांच्या विशेष ब्लॉकमधील हा १३ वा दिवस असून, या काळात टिटवाळा-कसारा दरम्यान उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. एकूण २३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहे.

टिटवाळा स्थानकातील १५ डब्याच्या लोकलसाठी फलाट विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.१० या कालावधीत सुमारे ५ ते ६ तासांचा ब्लाॅक घेण्यात येत आहे. या कालावधीत टिटवाळा येथे संपणाऱ्या सर्व लोकल आता आसनगावपर्यंत धावतील, तर टिटवाळाहून सुटणाऱ्या लोकल आसनगावहून सुरू होतील. तर, ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री ११.३० ते पहाटे ५.१० दरम्यान ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान टिटवाळ्यापर्यंत येणाऱ्या सर्व लोकल आसनगावपर्यंत वाढवण्यात येतील. तर टिटवाळ्याहून सुटणाऱ्या लोकल आसनगावहून सुरू होतील.

वाहतुकीवर परिणाम

– मध्य रेल्वेने डाऊन मार्गावरील १२ आणि अपच्या ११ लोकल रद्द केल्या आहेत. काही लोकल ठाणे किंवा कल्याणपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. वातानुकूलित टिटवाळा लोकलचाही प्रवास ठाण्यापर्यंत मर्यादित राहील.

– मेल-एक्सप्रेस वाहतुकीवरही परिणाम होणार असून गाडी क्रमांक ११०४८ गोरखपूर-दादर एक्स्प्रेस वासिंद येथे, तर गाडी क्रमांक २२१०४ अयोध्या कँट-एलटीटी एक्स्प्रेस आटगाव येथे काही काळ थांबवण्यात येईल.

– शालीमार-एलटीटी, हावडा-सीएसएमटी आणि नागपूर-मडगाव एक्सप्रेस या गाड्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

उपनगरीय सेवा रद्द

डाऊन सेवा

– सीएसएमटी येथून रात्री १०, १०.५०, ११.१६ आणि ११.४२ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल – सीएसएमटी येथून सकाळी ८.४१ आणि रात्री ८.४२ वाजता सुटणाऱ्या कुर्ला लोकल – सीएसएमटी येथून रात्री १२.०८ वाजता सुटणारी कसारा लोकल

– सीएसएमटी येथून सकाळी ८.०८ वाजता सुटणारी ठाणे लोकल

– ठाणे येथून पहाटे ५.३५ वाजता सुटणारी टिटवाळा लोकल

– कुर्ला येथून सायंकाळी ५.५९ वाजता सुटणारी कल्याण लोकल

– सीएसएमटी येथून रात्री ८.५६ वाजता सुटणारी आसनगाव लोकल

अप सेवा

– टिटवाळा येथून सकाळी ६.१३, रात्री ९ आणि रात्री १०.०६ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकल

– ठाणे येथून सकाळी ९.०८ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल –

कल्याण येथून सायंकाळी ७.०२ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल

– टिटवाळा येथून सकाळी ८.०९ वाजता सुटणारी परळ लोकल

– टिटवाळा येथून रात्री १०.२५ आणि रात्री ११.१४ वाजता सुटणाऱ्या ठाणे लोकल

– आसनगाव येथून रात्री ११.०८ वाजता सुटणारी ठाणे लोकल

शेवटच्या आणि पहिल्या लोकल

– ब्लॉकपूर्वी शेवटची कसारा लोकल सीएसएमटी येथून रात्री १०.४७ वाजता सुटेल

-ब्लॉकपूर्वी शेवटची सीएसएमटी लोकल कसारा येथून रात्री १० २२.०० वाजता सुटेल

– ब्लॉकनंतर पहिली कसारा लोकल सीएसएमटी येथून पहाटे ४.१९ वाजता सुटेल

– ब्लॉकनंतर पहिली सीएसएमटी लोकल कसारा येथून रात्री ३.५१ वाजता आणि टिटवाळा येथून पहाटे ५.११ वाजता सुटेल