मुंबई : मध्य रेल्वेने टिटवाळा स्थानकावर १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचे काम वेगाने सुरू केले असून १५ दिवसांच्या विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकचा दुसरा टप्पा २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत जाहीर केला आहे. ब्लॉक कालावधीत टिटवाळा ते कसारा दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात येईल.

टिटवाळा स्थानकातील १५ डब्याच्या लोकलसाठी फलाट विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.१० वाजेपर्यंत सुमारे ५ ते ६ तासांचा ब्लाॅक घेतला जाईल. या संपूर्ण कालावधीत ११ सप्टेंबरपर्यंत टिटवाळा येथे प्रवास संपणाऱया सर्व लोकल आता आसनगावपर्यंत धावतील, तर टिटवाळ्याहून सुटणाऱ्या लोकल आसनगावहून सुटतील. २ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत दररोज मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक राहणार असून, त्याचा परिणाम उपनगरीय; तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे. ब्लॉकदरम्यान टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान कोणतीही उपनगरीय सेवा उपलब्ध नसेल.

त्यामुळे रात्रीच्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द होणाऱ्या प्रमुख लोकलमध्ये सीएसएमटीहून रात्री १०, १०.५०, १०.४७, १२.०८ वाजताच्या टिटवाळा व कसारा लोकल, ठाणे–टिटवाळा पहाटे ५.३५ ची लोकल; तसेच टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळी ६.१३, ९, १०.०६ च्या लोकलचा समावेश आहे.

ठाणे आणि कल्याणपर्यंतच धावणाऱ्या लोकल

३ ते ९ सप्टेंबरदरम्यान काही नियमित लोकलचे मार्गही कमी करण्यात आले आहेत.

– सकाळी ६.३० ची सीएसएमटी–टिटवाळा वातानुकूलित लोकल आणि दुपारी ३.३३ ची दादर–टिटवाळा वातानुकूलित लोकल फक्त ठाण्यापर्यंत धावेल.

– सीएसएमटीहून सकाळी ११.२४ आणि दुपारी १.४२ च्या टिटवाळा लोकल ठाण्यापर्यंतच जातील.

– सीएसएमटीहून सकाळी ९.२७ आणि सायंकाळी ७.४६ च्या टिटवाळा लोकल कल्याणपर्यंतच धावतील.

– टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या काही लोकल ठाणे किंवा कल्याणहून सुटतील. —-

शेवटच्या आणि पहिल्या लोकलमध्ये बदल

प्रवाशांसाठी शेवटच्या आणि पहिल्या लोकलच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत.

– सीएसएमटीहून कसाऱयासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल रात्री ९.३२ वाजता सुटेल.

– सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी शेवटची लोकल रात्री ९.२० वाजता असेल.

– ब्लॉकनंतर कसाऱयासाठी पहिली लोकल पहाटे ४.२९ (नियोजित वेळ ४.१९) वाजता सुटेल.

एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत मोठे बदल

ब्लॉकचा फटका अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही बसणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस–पाटलीपुत्र, एलटीटी–पुरी, एलटीटी–भुवनेश्वर, एलटीटी–हातिया, एलटीटी–विशाखापट्टणम, सीएसएमटी–अमृतसर आणि सीएसएमटी–बनारस महानगरी एक्स्प्रेस या गाड्या पहाटे ४ ते ४.४५ या वेळेत पुनर्नियोजित करण्यात आल्या आहेत.

दादर, एलटीटी आणि सीएसएमटीकडे येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या वासिंद, आटगाव, खर्डी, कसारा आणि इगतपुरी या स्थानकादरम्यान थांबवण्यात येतील. यात पंजाब मेल, देवगिरी एक्स्प्रेस, मंगलाद्वीप एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचा समावेश आहे.

प्रवाशांना रेल्वेचे आवाहन

टिटवाळा स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी फलाट विस्ताराचे काम सुरू असून, सुरक्षित आणि सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.