मुंबई : मध्य रेल्वेकडून टिटवाळा स्थानकात पॉइंट्सच्या टॅम्पिंगच्या कामासाठी १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२.४५ ते २.१५ या वेळेत विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कसारा–कल्याण दरम्यान उपनगरीय लोकल सेवा बंद राहणार असून चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच दोन लोकल फेऱ्या ठाणे स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून रात्री ११.१६ आणि ११.४२ वाजता टिटवाळ्याकडे सुटणाऱ्या; तसेच टिटवाळ्याहून रात्री १०.२५ आणि ११.१४ वाजता ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. डोंबिवलीहून रात्री १० वाजता आणि कल्याणहून रात्री १०.०६ वाजता सीएसएमटीकडे सुटणाऱ्या लोकल ठाण्यापर्यंतच चालविण्यात येतील.

ब्लॉकपूर्वी शेवटच्या लोकल कधी?

कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटीहून रात्री १२.०८ वाजता, तर टिटवाळ्याकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १०.५० वाजता सुटेल. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १० वाजता, तर आसनगावहून ठाण्याकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.०८ वाजता रवाना होईल.

ब्लॉकनंतर पहिल्या लोकल

ब्लॉकनंतर कसाऱ्याकडे जाणारी पहिली लोकल सीएसएमटीहून पहाटे ४.१९ वाजता सुटेल. सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल कसाऱ्याहून पहाटे ३.५१ वाजता आणि टिटवाळ्याहून ३.५६ वाजता रवाना होईल.

टिटवाळा येथील अप नॉर्थ-ईस्ट मार्गावरील पॉइंट क्रमांक १०९ आणि ११३ बीच्या टॅम्पिंगचे काम या ब्लॉकमध्ये करण्यात येणार आहे. मार्गाची देखभाल आणि प्रवासी सुरक्षेसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, प्रवाशांनी बदललेल्या वेळांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.