मुंबई : मध्य रेल्वेने टिटवाळा स्थानकावर १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचे काम हाती घेतले असून, या कामासाठी १५ दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. परंतु, या ब्लॉकमुळे प्रवाशांना प्रचंड विलंब यातना सहन कराव्या लागल्या. शुक्रवारी सकाळी ५ अप आणि ९ डाऊन उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या. परिणामी, प्रवाशांना सकाळी गर्दीच्या वेळी प्रवास करताना गैरसोयीचा सामना करावा लागला.
टिटवाळा स्थानकातील पायाभूत सुविधा विस्ताराच्या कामासाठी सुरू असलेल्या आठव्या दिवसाच्या ब्लॉकचा फटका शुक्रवारी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसला. सकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक उपनगरी रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा ४० ते ५० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ब्लॉकमुळे ५ अप, तसेच ९ डाऊन उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचा मोठा भार इतर उपनगरी रेल्वेगाड्यांवर आला. प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला.
मध्य रेल्वेने टिटवाळा स्थानकातील १५ डब्यांच्या उपनगरी रेल्वेगाडीसाठी फलाट विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.१० दरम्यान सुमारे ५ ते ६ तासांचा ब्लाॅक घेतला आहे. सध्या ब्लॉकचा दुसरा टप्पा सुरू आहे. प्रवाशांना सकाळी ६ पासून उपनगरी रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कसारा या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच खोपोली, कर्जतवरून सीएसएमटीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.
सलग गाड्या रद्द झाल्याने, प्रवाशांची गर्दी वाढत गेली. नियोजित वेळापत्रकापेक्षा उपनगरी रेल्वे सेवा ४० ते ५० मिनिटे उशिराने धावत असल्याने अनेकांना फलाटांवर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर आलेल्या उपनगरी रेल्वेगाडीतील प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. अनेक नोकरदार व विद्यार्थी वेळेत इच्छितस्थळी पोहोचू शकले नाहीत. काहींना कार्यालयात उशिरा जावे लागले.
काहींनी जलद मार्गावरील उपनगरी रेल्वेगाड्यांचा वा अन्य वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. टिटवाळा स्थानकावर सुरू असलेले फलाट विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात १५ डब्यांच्या लोकलची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
