मुंबई: शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानाही, विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या या १०० मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटची सर्रास विक्री सुरू आहे. सरकारकडून या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल २३ हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले असून, सुमारे ३.७७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विधान परिषदेत या संदर्भात तारांकित प्रश्न

आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी विचारला होता. मंत्री झिरवाळ यांनी या संदर्भातील कारवाईची आकडेवारी लेखी उत्तरातून जाहीर केली आहे. शाळांच्या परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या ६७ आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी ६ ठिकाणी प्रतिबंधित साठा आढळल्याने १ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून प्रथम माहिती अहवाल (एफआयआर)नोंदविण्यात आला आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत केलेल्या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थ बरोबरच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियामांतर्गत ३३,२२१ खटले आणि महाराष्ट्र दारुबंदी १,२३,०३३ खटले दाखल केल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली आहे.

पुणे, सांगली, ठाण्यात कारवाई

पिंपरी-चिंचवड परिसरात शाळा आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात ६ गुन्हे आणि २३९ खटले दाखल करण्यात आले आहेत. सुमारे १.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर सांगली येथे ४३ जणांवर गुन्हे दाखल करून ८,६०० रुपयांचा दंड आणि लेखी नोटीस बजावली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे एकाच कारवाईत ९८ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे.

विद्यार्थ्यांना व्यसनापासून रोखण्यासाठी मोहीम केवळ कारवाईवर न थांबता, सरकारने जनजागृतीवरही भर दिला आहे. विद्यार्थ्यांना सकस आहाराच्या सवयी लावणे आणि व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर अमली पदार्थविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली असून, शाळा-कॉलेजांमध्ये ‘नशामुक्त अभियान’ राबवले जात आहे असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.