scorecardresearch

गोवर लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस; मुंबईमध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य

गोवरचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने दिलेल्या सूचनेनुसार दोन टप्प्यांमध्ये नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.

गोवर लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस; मुंबईमध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य
संग्रहित छायाचित्र

गोवरचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने दिलेल्या सूचनेनुसार दोन टप्प्यांमध्ये नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील आज शेवटचा दिवस असून, मुंबई महानगपालिकेने लसीकरणाचे ठेवलेले उद्दिष्ट साध्य केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>>: वेब पोर्टल ‘रिएल इस्टेट एजंट’ असल्याबाबत संदिग्धता कायम

गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारच्या कृती दलाने ३० दिवसांच्या अंतराने दोन टप्प्यांत लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५ ते २८ डिसेंबर २०२२ दरम्यान बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १५ जानेवारीपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेने दुसऱ्या टप्प्यामध्ये ‘एमआरसीव्ही १’ या लसीची मात्रा १,७६२ तर ‘एमआरसीव्ही २’ या लसीची मात्रा १,९५२ बालकांना देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेकडून लसीकरणाचे हे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे. २४ जानेवारीपर्यंत मुंबई महानगरपालिकेने २१२ लसीकरण सत्रांमार्फत ‘एमआरसीव्ही १’ लसीची मात्रा १,६७६ बालकांना, तर ‘एमआरसीव्ही २’ लसीची मात्रा १,८७९ बालकांना देण्यात आली. त्यामुळे अखेरच्या दिवशी दोन्ही लसींची मात्रा घेण्यापासून जवळपास १०० बालके वंचित असून या बालकांचे अखेरच्या दिवशी म्हणजे २५ जानेवारी रोजी लसीकरण होऊन महानगरपालिकेने निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण होईल. ‘एमआरसीव्ही १’ आणि ‘एमआरसीव्ही २’ या दोन्ही लस दिलेल्या बालकांना जीवनसत्व अ च्या गोळ्याही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>मुंबई: एमएमआरडीएच्या ‘मुंबई १’ कार्डद्वारे मेट्रोसह बेस्ट प्रवासही; बेस्टचे तिकीटही आता उपलब्ध

त्याचप्रमाणे बांधकामस्थळी व पुलाखाली राहणाऱ्या बालकांसाठी २४ डिसेंबरपासून विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आलेत आहे. या शिबिरांतर्गत आतापर्यंत बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या ९२ बालकांना ‘एमआरसीव्ही १’ तर ५५ बालकांना ‘एमआरसीव्ही २’ लसीची मात्रा देण्यात आली. पुलाखाली राहणाऱ्या १०० बालकांना ‘एमआरसीव्ही १’. तर ४८ बालकांना ‘एमआरसीव्ही २’ लसीची मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 13:31 IST

संबंधित बातम्या