मुंबई : ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या माध्यमातून वेगळी वाट निर्माण करू पाहणार्या, समाजाभिमुख कार्य उभारण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या युवा गुणवंतांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. ‘भविष्यानेही आशेने पाहावे, अशा वर्तमानाचा गौरव’ या तत्त्वाने सुरू करण्यात आलेल्या ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठी देशभरातून प्रज्ञावंत तरुण मंडळींचा शोध घेण्यात येतो. यंदाही या पुरस्कारांसाठी अर्ज नोंदणी करण्याचा आज (सोमवार) अखेरचा दिवस आहे.
प्रशासकीय सेवा क्षेत्रातही लोकांसाठी
काम करताना ठोस उपयुक्त उपक्रम असोत वा नवउद्यमींनी स्वत:च्या कल्पकतेतून आणि अभ्यास प्रयत्नांतून साकारलेले उद्योगविश्व असो, नेहमीच्या दैनंदिन कार्यापलीकडे जाऊन वेगळा विचार करणार्या तरुण पिढीच्या या जिद्दीला, त्यांच्या परिश्रमाला योग्य वेळी दाद मिळाली, तर त्यांचा उत्साह वाढतो. म्हणूनच ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या माध्यमातून गेली सात वर्षे सातत्याने अशा समाजाभिमुख कार्य करणार्या युवारत्नांचा शोध घेत त्यांचे कौतुक केले आहे.
आत्तापर्यंत देशभरातील १०० हून अधिक प्रज्ञावंत तरुण मंडळींचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यंदाही राज्यभरातून या पुरस्कारांसाठी प्रवेश अर्जनोंदणी सुरू झाली आहे. अधिकाधिक तरुण-तरुणींना या संधीचा लाभ घेता यावा, यासाठी पुरस्कारांच्या प्रवेश अर्जनोंदणीची मुदत १६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.
