scorecardresearch

सोमय्या कुटुंबाचा १०० कोटींचा शौचालय घोटाळा!; संजय राऊत यांचा आरोप

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाला आहे. म्हणजे ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पाहा. विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला. किरीट सोमय्या व त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळय़ाची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा. खरे म्हणजे यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात राग आहे. शरद पवारांवर त्यांनी ट्विटवर ट्विट केले.

एखादे ट्विट आयएनएस विक्रांत घोटाळय़ावर करायला हवे. एखादे ट्विट त्यांनी या शौचालय घोटाळय़ावर करावे, असे राऊत म्हणाले. या आरोपांवर बोलताना सोमय्या यांनी राऊत  यांनी आधी घोटाळय़ाची कागदपत्रे तर सादर करावी मग त्याला उत्तर देईन, असे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Toilet scam of somaiya family allegation sanjay raut ysh

ताज्या बातम्या