मुंबई : कर्जत येथे टोरंट पॉवर कंपनीच्या तीन हजार मेगावॉटच्या ‘पंप स्टोरेज’ प्रकल्पासाठी भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील ३२ ते ३३ हजार झाडांची कत्तल करण्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या वादाप्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर २६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद यांनी ही याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे ती सादर करण्यात आली असता त्यावर २६ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
वनजमिनीच्या वापर बदलासह वृक्षतोडीला दिलेल्या परवानगीला या याचिकेत प्रामुख्याने आव्हान देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी वनजमिनीचा वापर बदल करण्यास राज्य सरकारच्या वन विभागाने ६ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली होती. १४ ऑक्टोबर रोजी वृक्षतोडीची बेकायदा परवानगी दिली गेली, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या उद्घाटनासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच घाईघाईने हे निर्णय घेतले गेले’, असा दावा देखील याचिकाकर्त्याने केला आहे. तसेच, वनहक्क कायद्यानुसार मूळ निवासींचे हक्क निश्चित होऊन ग्रामसभांची संमती मिळेपर्यंत सरकारच्या दोन्ही निर्णयांच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी. प्रकल्पाच्या ३७७ हेक्टर क्षेत्रात वृक्षतोड वा वनेतर कामे करण्यास वन विभाग आणि टोरंटला मनाई करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
टोरंट कंपनीतर्फे कर्जत तालुक्यात १३ हजार ५०५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी ३७७ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यात २३३ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. उर्वरित १४४ हेक्टर जमीन पाच गावांतील आहे. त्याचप्रमाणे, प्रकल्पासाठी ३२ हजार ४०० झाडे तोडली जाणार आहेत. प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीच्या नोंदींमध्येही धाक गावातील ग्रामसभेची मंजुरी प्रलंबित असल्याचे नमूद आहे.
या गावातील ९६.३९ हेक्टर वनजमीन आणि ७३.५५ हेक्टर खासगी जमीन प्रकल्पासाठी आवश्यक असून, ग्रामसभेच्या मंजुरीचा विषय कर्जतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. वनहक्क कायद्यातील कलम ४ (५) नुसार मूळ निवासींच्या हक्कांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना जमिनीतून बेदखल करता येत नाही. मात्र, प्रकल्पाला आणि त्यासाठी झाडे तोडण्यास परवानगी देताना याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे.
राज्य सरकारने ६ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशात या परिसरातील मूळ निवासींचे हक्क निश्चित केल्याचा किंवा संबंधित ग्रामसभांनी संमती दिल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे वनजमिनीच्या वापरबदलाला मंजुरी देण्यासाठी आवश्यक मूलभूत कायदेशीर अटींची पूर्तताच झालेली नाही. परिणामी, राज्य सरकारचा आदेश हा या नियमांसह केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीतील अटींचेही उल्लंघन करणारा आहे. वनहक्क निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच ३२ हजार ४०० झाडांची कत्तल केल्यास वनहक्क कायद्यामागील मूळ उद्देशच निष्फळ ठरेल’, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
