मुंबई : दिवाळी सुटीच्या हंगामाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राला जगाच्या आणि देशाच्या पर्यटन नकाशावर पुढे आणण्यासाठी कोणती धोरणे आखण्यात येत आहेत, पर्यटन उद्योगाच्या प्रगतीच्या नव्या संधी याचा ऊहापोह ‘लोकसत्ता’च्या वतीने आज, शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन परिषदेत होणार आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर आदी मान्यवर या पर्यटन परिषदेत सहभागी होणार आहेत.

विदर्भातील जंगलांपासून ते कोकणातील समुद्र किनाऱ्यापर्यंत आणि लेणी, धार्मिक क्षेत्रे अशा विविध पर्यटन क्षेत्रांची देणगी महाराष्ट्राला लाभली आहे. करोनामुळे गेली पावणे दोन वर्षे पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगावर विपरीत परिणाम झाला. आता करोनाचे सावट दूर होत असल्याने दिवाळीच्या सुटीच्या हंगामात पर्यटनाला पुन्हा चालना मिळण्याची अपेक्षा असून पर्यटन उद्योग पुन्हा भरारी घेण्यास सज्ज होत आहे. अशा वातावरणात पर्यटन विभाग आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील व्यावसायिकांना पर्यटन क्षेत्रातील अडचणी, संधी आणि संभाव्य उपाययोजना यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ लोकसत्ता पर्यटन परिषदेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्राला पर्यटनाच्या क्षेत्रात देशातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून पुढे आणण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे नवनव्या कल्पना मांडत आहेत. राज्याच्या पर्यटन उद्योगाच्या प्रगतीसाठी राज्य सरकार काय धोरणे आखत आहे आणि पुढची वाटचाल कशी असेल याबाबत आदित्य ठाकरे भाष्य करतील. तर देशातील पर्यटन व्यवसायाच्या नकाशावर महाराष्ट्राला असलेल्या संधी आणि त्यासाठी काय करायला हवे याचा ऊहापोह इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल आपल्या भाषणात करतील. 

विकासासाठी मंथन..‘मार्के टिंग मॅग्निफिशिएंट महाराष्ट्र’ या चर्चासत्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर, कामत हॉटेल्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल कामत, वीणा वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाटील आणि राज्याच्या कृषी व ग्रामीण पर्यटनविषयक समितीचे सदस्य पांडुरंग टावरे हे राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांना महाराष्ट्राच्या- जगाच्या नकाशावर कशा रीतीने आणता येईल यावर मंथन करतील.

उपाययोजना..

‘पुटिंग महाराष्ट्र टुरिझम ऑन फास्ट ट्रॅक’ या विषयावरील चर्चासत्रात पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, श्ॉले हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, के सरी टूर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील, फार होरायझन टूर्स प्रा. लि.चे अध्यक्ष संजय बासू हे महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांवर- धोरणांवर चर्चा करतील.

धोरणांची माहिती..

महाराष्ट्राला पर्यटनाच्या क्षेत्रात देशातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून पुढे आणण्यासाठी राज्य सरकार काय धोरणे आखत आहे याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मांडणी करतील. देशातील पर्यटन व्यवसायाच्या नकाशावर महाराष्ट्राला असलेल्या संधी व त्यासाठी काय करायला हवे याचा ऊहापोह इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल आपल्या भाषणात करतील.

प्रायोजक

’मुख्य प्रायोजक : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र

’सहाय्य: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

’कॉर्पोरेट पार्टनर : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)