scorecardresearch

स्वागत २०२३..; सरत्या वर्षांला जल्लोषात निरोप

सरत्या वर्षांला निरोप देऊन नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेक नागपूरकरांनी पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे गाठली.

स्वागत २०२३..; सरत्या वर्षांला जल्लोषात निरोप
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मुंबई : दोन वर्षांच्या करोनाग्रस्त वातावरणात गुदमरलेल्या मुंबईकरांनी शनिवारी संध्याकाळी मुक्त वातावरणात सरत्या वर्षांला निरोप देत नव्या वर्षांचे फेसाळत्या उत्साहात स्वागत केले. आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघालेल्या मुंबईतील पर्यटनस्थळांच्या परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीत वर्षांरंभाचा जल्लोष करण्यात आला. अनेक मुंबईकरांनी शहरातल्या नेहमीच्या गजबजाटापासून दूर पर्यटनस्थळी जाऊन नववर्षांचे स्वागत केले.

लोणावळा, अलिबागसह रायगड आणि पालघरमधील समुद्र किनारे, महाबळेश्वर, पाचगणी आदी ठिकाणी ठाणेकर आणि मुंबईकरांची कुटुंबे शुक्रवारीच दाखल झाली होती. तर काही नोकरदारांनी शनिवारी कुटुंबासह पर्यटन स्थळांकडे कूच केल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे चित्र होते. अनेक कुटुंबे पर्यटनस्थळी गेल्याने शहरात शनिवारी तुलनेने वर्दळ कमी होती.   मुंबईकरांनी पर्यटनस्थळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सरत्या वर्षांला निरोप दिला आणि रात्री उत्फुल्ल उत्साहात नव्या वर्षांचे स्वागत केले.

पर्यटनस्थळी जाण्याची

संधी साधू न शकलेल्या मुंबईकरांनी शनिवारी सकाळी कार्यालयात हजेरी लावून संध्याकाळी कुटुंबासह समुद्रकिनारे गाठले. सरत्या वर्षांतील अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटीवर पर्यटकांची झुंबड उडाली. अनेकांनी सूर्यास्त मोबाइलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, जुहूसह मुंबईतल्या सर्वच समुद्र किनाऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.

चर्चगेट, गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, माटुंग्यातील पाच उद्याने, रुईया नाका, बॅण्ड स्टॅण्ड, जुहू चौपाटी आदी ठिकाणी मुंबईकरांनी उत्साहात नववर्षांचे स्वागत केले. रात्री १२ वाजताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काही इमारतींच्या आवारात आणि गच्चीवर डीजेच्या तालावर नववर्षांच्या स्वागताचा जल्लोष करण्यात आला. 

मुंबईतील हॉटेल्स, क्लब आदी ठिकाणी नववर्षांच्या स्वागतानिमित्त निरनिराळय़ा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चोखंदळ खवय्यांनी ठिकठिकाणच्या उपाहारगृहांमध्ये गर्दी केली होती. तसेच काही उपाहारगृहांमध्ये खास मेजवान्यांचे आयोजन करण्यात आले होते.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मद्यपी आणि भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

अथांग सागर दर्शन नववर्षांच्या जल्लोषाचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घडविणारी बेस्टची दुमजली खुली बस मुंबईबाहेरून आलेल्या पर्यटकांचे खास आकर्षण बनली. मरिन ड्राइव्ह आणि वरळी-वांद्रे सागरी सेतूवरील रोषणाई पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. तसेच गिरगाव चौपाटी, दादर चौपाटीवरील दर्शनी गॅलरीमधून अथांग सागराचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या