मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मंगळवारी सकाळी मनस्तापाचा सामना करावा लागला. मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली होती. कल्याण- ठाकुर्लीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या जलद लोकल कल्याणवरुन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

मंगळवारी सकाळी कल्याण ते ठाकूर्लीदरम्यान रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर सीएसटीकडे येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली होती.  ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु होती.  सकाळी साडे आठच्या सुमारास रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. पण ९.३० वाजेपर्यंत वाहतूक विलंबाने सुरु असल्याची तक्रार प्रवासी करत होते.

मध्य रेल्वेवर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहतूक विस्कळीत होत असते. सोमवारी हार्बर रेल्वेवर रुळाला तडे गेल्याने सुमारे ४५ फेऱ्यांना विलंब झाला होता. रोज तांत्रिक बिघाड होत असेल तर मग मेगा ब्लॉक घेऊन नेमके काय काम केले जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहे.