करोनामुळे टाळेबंदी, कमी मनुष्यबळाचा फटका

मुंबई : मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील नऊ पादचारी पुलांच्या कामांत अडथळा आला आहे. या पुलांच्या कामांना गती मिळाली नसून त्यांची कामे काही महिन्यांत पूर्ण केली जातील, असा दावा मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) केला आहे.

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकांत तसेच दोन स्थानकांदरम्यान एमआरव्हीसीकडून पादचारी पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या दोन्ही मार्गावरील एकूण ३० पादचारी पूल उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यात मध्य रेल्वेवरील १४ आणि पश्चिम रेल्वेवरील १६ पुलांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील १४ पुलांपैकी आठ पूल पूर्ण झाले आहेत. तर कसारा, उल्हासनगर, गोवंडी, वडाळा रोड व दादर स्थानकांत एकूण सहा पूल रखडले आहेत. पश्चिम रेल्वेवरील १३ पुलांचे काम पूर्णत्वास नेताना त्यातील तीन पूल पूर्ण होण्यात अडथळे निर्माण झाले. यामध्ये सांताक्रूझ, चर्नी रोड, विलेपार्ले स्थानकांतील पुलांचा समावेश आहे.

मार्च २०२० पासून टाळेबंदी लागली आणि त्यानंतर रेल्वेची कामे धिम्या गतीने होऊ लागली. अनेक श्रमिक परराज्यांत गेल्यानंतर पादचारी पूल, फलाटांसह विविध रेल्वे प्रकल्पांची कामे रखडली. गेल्या वर्षी पावसाळ्यातील तीन महिन्यांतही कामे बंदच होती. त्यानंतर साधारण टाळेबंदी शिथिल होताच कमी मनुष्यबळात कामांना सुरुवात झाली. परंतु करोनाची दुसरी लाट सुरू होताच पुन्हा मोठय़ा संख्येने श्रमिक परराज्यांत गेले. त्यामुळे गेल्या वर्षीपासून नऊ पादचारी पुलांच्या कामांना गतीच मिळू शकली नाही. काहींचा पाया रचला गेला आहे, तर काहींचे ५० टक्केच काम झाले आहे. लवकरच नऊ पादचारी पुलांचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.