निर्माते-कलादिग्दर्शक वेठीस; राजकीय-बिगरराजकीय संघटनांचा शिरकाव

मुंबई : कामगार संघटना आणि मजूर पुरवणारे कंत्राटदार चित्रपट-मालिकांच्या निर्मात्यांना पैशांसाठी वेठीस धरतात. यातील मजूर पुरविणाऱ्या कंत्राटदारांकडे गुन्हे शाखा विशेष लक्ष देत असून प्रतिबंधात्मक उपायही योजले जात आहेत. मात्र तक्रार होत नसल्याने चित्रनगरीत अस्तित्व असलेल्या राजकीय, बिगरराजकीय संघटना मात्र मोकाट आहेत, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

चित्रनगरीत नेपथ्य उभारणी, काम आटोपल्यावर त्याची विल्हेवाट आणि नेपथ्याची सुरक्षा यासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल, अकुशल मजुरांची आवश्यकता भासते. हे मजूर पुरविण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी अनेकांत चढाओढ आहे. या कंत्राटदारांमध्ये काही गुंड, सराईत गुन्हेगार आहेत. काही गुंडांच्या पाठबळावर दादागिरी करतात. या स्पर्धेने कंत्राटदारांच्या टोळ्या अस्तित्वात आल्यापासून त्या एकमेकांवर सतत कुरघोडी करत असतात. यातून हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, अपहरण, खंडणी आदी गंभीर गुन्हे चित्रनगरी, आरे वसाहतीत घडले आहेत. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने मजूर, सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंत्राटदारांची यादी तयार केली. यातील गुन्हेगारी पाश्र्वाभूमी असलेल्यांची संपूर्ण माहिती नोंद केली. त्यांना नियमितपणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहावे, अशी सूचना केली.

गेल्या पाच महिन्यांपासून कंत्राटदार हजेरी लावत आहेत, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र कामगार संघटनांकडून होणाऱ्या जाचाबाबत एकही तक्रार आरेसह आसपासच्या पोलीस ठाण्यात दाखल नसल्याचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत, आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक नूतन पवार यांनी सांगितले.

अशाप्रकारची गुंडगिरी आणि युनियनचा धाक सगळीकडे आहे. हा धाक विकृत आणि स्वार्थी आहे. या सगळ्या सेट्सवर अजूनही बरेच धाक आहेत. आठवड्याला पैसे पोहोचले नाहीत तर ते सेट्स तोडून निघून जातात. तुम्ही कितीही गयावया के ले तरी तुमचे ऐकू न घेतले जात नाही. राजू साप्तेंच्या सेटवरही हे घडले आहे, अशी माहिती दिग्दर्शक-निर्माते वीरेंद्र प्रधान यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कुठल्याही संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा माणूस सेटवर जाऊन चित्रिकरण बंद पाडू शकत नाही. यापुढे कु ठल्याही संघटनेचा माणूस सेटवर येऊन अशापध्दतीने त्रास देत असेल तर मनसेच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधा. अशा लोकांचा बंदोबस्त मनसेतर्फे  के ला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. यापुढे कु ठल्याही सेटवर मराठी माणसाला चित्रीकरण बंद करण्याची धमकी दिली वा पैसे देण्यासाठी तगादा लावला तर त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला

कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्देवी आहे. त्यांच्या समस्यांबद्दल त्यांनी कोणाशीतरी बोलायला हवे होते. आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही, अशी भावना शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी व्यक्त के ली. मात्र सेटवरच्या या अशा गुंडगिरीला आळा बसवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करायला हव्यात. त्या उद्देशानेच काही कलादिग्दर्शक, निर्माते एकत्र येऊन सोमवारी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदे आणि सुव्यवस्था) विश्वाास नांगरे पाटील यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती बांदेकर यांनी दिली.

धमकावणी….

चित्रनगरीत ४० हून अधिक कामगार संघटना आहेत. त्यात १० ते १२ राजकीय पक्षांच्या संघटनांचा समावेश होतो. या संघटना चित्रपट-मालिका निर्मितीशी संबंधित व्यक्तींकडे पैशांची मागणी करतात. ती पूर्ण न केल्यास ‘सेट’वर जाऊन धमकावणे, चित्रीकरण थांबवणे, कामगारांना हाताशी धरून काम बंद पाडणे हे प्रकार चित्रनगरीत वरचेवर होतात, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळते. तक्रार केल्यास भविष्यात काम करू देणार नाहीत, या भीतीने मध्यस्थ गाठून तडजोड करण्यावर अधिक भर असतो. या तडजोडीबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते, असे अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चित्रनगरीतील अभिलेखवरील (रेकॉर्ड) गुन्हेगारांकडून गुन्हा घडू नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले आहेत, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. मात्र अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

गुन्ह्यांचा इतिहास…

’२०१५ मध्ये राजू शिंदे यांची चित्रनगरीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. चित्रनगरीतील बरीचशी कंत्राटे शिंदे यांनाच मिळत. त्यामुळे त्यांच्या हत्येमागे कंत्राट मिळविण्यासाठीची स्पर्धा असावी, असाही एक अंदाज होता. ’२०१७ –  चित्रनगरीत सुरक्षा पुरविण्याचे कंत्राट न मिळाल्याने अन्य कंत्राटदाराने विरा पांडियन यांची हत्या घडवून आणली होती.

’२०१९ – सराईत गुंड शिवा शेट्टी आणि त्याचे साथीदार चित्र नगरीत धडकले. त्यांनी एका निर्मात्या कंपनीने चित्रीकरणासाठी उभारलेल्या नेपथ्याची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी मोक्कानुसार गुन्हा नोंदवला. शेट्टीने सुचविलेल्या व्यक्तीस कंत्राट न दिल्याने त्याने हा गुन्हा केला होता. त्या आधीही शेट्टीची चित्रनगरीवर दहशत होती.

…तर साप्ते वाचू शकले असते

राजेश साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसारित केलेली ध्वनिचित्रफीत दिंडोशी पोलिसांच्या हाती शुक्रवारी संध्याकाळीच पडली होती. साप्ते यांनी आरोप केलेले राकेश मौर्य यांनीच ती पोलिसांना आणून दाखवली.पोलिसांनी साप्ते यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या वाकड परिसरात साप्ते यांचे भ्रमणध्वनी स्थान आढळताच दिंडोशी पोलिसांनी वाकड पोलिसांना कळवून तातडीने शोधमोहीम राबविण्यास सांगितले. साप्ते यांचा नेमका ठावठिकाणा वेळीच हाती लागला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

नाहक बळी…

साप्ते यांच्यासारख्या उत्तम कलादिग्दर्शकाचा संघटनांच्या गुंडगिरीत नाहक बळी गेला आहे, असे मत निर्माते नितीन वैद्य यांनी व्यक्त के ले. वैद्य यांच्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या  मालिके च्या सेटचे काम साप्ते करत होते. त्यांना या कामाचे पैसेही देण्यात आले होते. मात्र आर्थिक वाद उकरून काढत मौर्य याने पैशाची मागणी केली होती.अडवणूकीमुळे हातातील कामे जात असल्याचा ताण त्यांना आला होता. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे  पाऊल उचलले असावे, असे वैद्य यांनी सांगितले.

साप्तेंवर चिंचवडला अंत्यसंस्कार चिंचवड लिंक रस्ता येथील स्मशानभूमीत शनिवारी दुपारी राजू साप्ते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय उपस्थित होते.

या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. मला न्याय मिळवून द्यावा, अशी असोसिएशनला विनंती आहे.   – सोनाली साप्ते, राजू साप्ते यांची पत्नी