मुंबई : दिवाळी जवळ येताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बोनसचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळावा यासाठी कामगार संघटना व लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे पाठपुरावा करू लागले आहेत. करोना काळात पालिका कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केल्यामुळे २५ ते ३० हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून करोनाचा कहर सुरू झाला आणि सुरुवातीपासूनच या विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागातील कामगार कार्यरत आहेत. कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, विविध खात्यातील कंत्राटी कामगार यांनी या काळात जिवाची पर्वा न करता जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावले. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षीपेक्षा जास्त बोनस द्यावा व बोनसबाबत   चर्चेसाठी बोलवावे याकरिता पालिकेतील सर्व संघटनांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. तर समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनीही पालिका आयुकतांना पत्र पाठवून कंत्राटी कामगारांनाही दहा हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे.

संघटनांनी दरवर्षी कितीही मागणी केली तरी पालिका प्रशासन १५ हजारांच्या आसपास बोनस देत असते. मात्र सानुग्रह अनुदानाची रक्कम जाहीर झाल्यानंतर कामगार संघटना श्रेय घ्यायला पुढे येत असतात. या वर्षी दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना आयुक्तांनी अद्याप बोनसची रक्कम जाहीर केलेली नाही. त्यामुळे आयुक्त कामगार संघटनांना चर्चेला बोलावतात का, नक्की किती बोनस जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किती बोनस मिळणार?

पालिकेत सुमारे एक लाख कर्मचारी असून दरवर्षी बोनससाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येते. मात्र टाळेबंदीमुळे पालिकेचे उत्पन्न घसरलेले असताना नक्की किती बोनस मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.