मुंबई : नोंदणीकृत व्यापरचिन्ह (ट्रेडमार्क) उल्लंघनाच्या आरोपाप्रकरणी पुणे येथील नेमसेक रेस्टॉरंटला पुढील सुनावणीपर्यंत बर्गर किंग नाव वापरण्यापासून उच्च न्यायालयाने सोमवारी मज्जाव केला. व्यापारचिन्हाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेमसेक रेस्टॉरंटविरुद्ध दाखल दावा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावण्याच्या निर्णयाला अमेरिकन कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अमेरिकन कंपनीच्या या अपिलाची न्यायमूर्ती अनिल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सोमवारी दखल घेतली. तसेच, प्रकरणाची सुनावणी ६ सप्टेंबर रोजी ठेवताना तोपर्यंत प्रतिवादी रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यास मज्जाव केला.
अमेरिकन फास्ट-फूड कंपनीने बर्गर किंग हे नाव वापरण्यापासून नेमसेक या रेस्टॉरंटला मज्जाव करावा, अशी मागणी करून कंपनीने या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात दावा दाखल केला होता. या नावाचा वापर केल्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत असून व्यवसायावरही परिणाम होत आहे. तसेच, प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचत असल्याचा दावा कंपनीने केला होता. परंतु, पुणे येथील हे रेस्टॉरंट बर्गर किंगच्या भारतातील पहिल्या आऊटलेटच्या अनेक वर्ष आधी म्हणजेच १९९२ पासून कार्यरत आहे, असे स्पष्ट करून पुणे न्यायालयाने अमेरिकन कंपनीचा दावा फेटाळला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयानंतर रेस्टॉरंटने दोन दिवसांपूर्वीच आपल्या संकेतस्थळावर हे नाव वापरण्यास पुन्हा सुरुवात केली. अनाहिता इराणी आणि शापूर इराणी यांच्या मालकीचे रेस्टॉरंट १९९२ पासून सुरू असून ते प्रसिद्ध देखील आहे. परंतु, तक्रारदार अमेरिकन कंपनी पुण्यातील आमची लोकप्रियता हिसकावून घेत आहे. मुळात बर्गर किंग कॉर्पोरेशनसारखी जगभरात दबदबा असलेली कंपनी आम्हाला का घाबरत आहे ? असा युक्तिवाद नेमसेक रेस्टॉरंटच्या वतीने सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी करण्यात आला. तर, अमेरिकन कंपनीने येथे पहिले फास्ट फूड आऊटलेट उघडण्याआधीच भारतात ‘बर्गर किंग’ असे नाव वापरत असल्याचे पुणे न्यायालयाने आदेशात नोंदवलेले मत चुकीचे आहे. बर्गर किंगचे भारतात ४०० हून अधिक आऊटलेट आहेत, त्यापैकी सहा पुण्यात असल्याचा प्रतिवाद कंपनीच्या वतीने करण्यात आला.
हेही वाचा – जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज
न्यायमूर्ती चांदूरकर आणि न्यायमूर्ती पाटील यांच्या खंडपीठाने कंपनीच्या युक्तिवादाची दखल घेतली. तसेच, प्रकरण ६ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवताना तोपर्यंत बर्गर किंग नावाचा वापर करण्यापासून न्यायालयाने रेस्टॉरंटला मज्जाव केला.