बेस्ट आणि शेअर टॅक्सीच्या प्रवासी संख्येतही घट
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. मात्र मागील काही दिवसांमध्ये सीएसएमटी परिसरातील वाहतूक कोंडीत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ‘आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३’ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर वाहतूक कोंडीत घट झाली असून दुसरीकडे बेस्ट आणि शेअर टॅक्सीच्या प्रवासी संख्येतही घट झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक आणि अतिजलद वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीचा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. यात ३३.५ किमी लांबीच्या ‘आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेचा समावेश असून या मार्गिकेचे बांधकाम मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) करण्यात आले आहे. तर या मार्गिकेचे संचनलही एमएमआरसीलच करीत आहे. ही मार्गिका तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली.
आरे – आचार्य अत्रे मार्ग चौक मेट्रो स्थानकदरम्यान मेट्रो ३ धावत असताना या मार्गिकेला मुंबईकरांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र ९ ऑक्टोबरपासून ‘मेट्रो ३’ पूर्ण क्षमतेने धावू लागली. आरे – कफ परेड दरम्यान मेट्रो सुरू झाल्यानंतर या मार्गिकेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. या मार्गिकेमुळे उपनगरातून वर्दळीच्या गिरगाव, महालक्ष्मी, काळबादेवीसह महत्त्वाच्या सीएसएमटी, चर्चगेट, हुतात्मा चौक, कफ परेडला काही मिनिटांत जाणे सोपे होऊ लागल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. मंत्रालय आणि आसपासच्या खासगी-सरकारी कार्यालयात जाणाऱ्यांनीही मेट्रोला पसंती दिली आहे. यामुळेच आता ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरून प्रतिदिन दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.
‘मेट्रो ३’ला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असतानाच दुसरीकडे या मार्गिकेमुळे सीएसएमटी परिसरातील वाहतूक कोंडीत ३० टक्के घट झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. जे. जे. उड्डाणपूल, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग आणि डी. एन. रोड येथून येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी सकाळी ९ ते १०.३० दरम्यान आणि सायंकाळी ५ ते रात्री ७.३० दरम्यान सीएसएमटी परिसरात होत असते. मात्र ‘मेट्रो ३’ मार्गिका सुरू झाल्यापासून गर्दीच्या वेळी सीएसएमटी परिसरातील वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी झाली आहे.
सीएमएमटीसह अन्य काही परिसरात वाहतूक पोलिसांकडून सर्वेक्षण सुरू असून या सर्वेक्षणातून ही बाब समोर आल्याचे मुंबई वाहतूक पोलीस सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली. सीएसएमटी परिसरातील वाहतूक कोंडीत घट झालेली असतानाच बेस्ट आणि शेअर टॅक्सीच्या प्रवासी संख्येतही ३० टक्क्यांनी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर सीएसएमटी आणि आसपसाच्या मेट्रो स्थानकावरून दिवसाला ४५ हजार प्रवासी ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरुन प्रवास करीत असल्याचीही बाब सर्वेक्षणातून समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. अतिजलद आणि सुकर प्रवासामुळे प्रवासी मेट्रोचा पर्याय स्वीकारत असून येत्या काळात मेट्रो मार्गिका मुंबईची नवीन जीवनवाहिनी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
