scorecardresearch

नवी मुंबई ते डोंबिवली केवळ १५ मिनिटांत

आज घडीला नवी मुंबईहून डोंबिवलीला जाण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते

नवी मुंबई ते डोंबिवली केवळ १५ मिनिटांत

ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाच्या पहिल्या टप्प्याची २०२३ पर्यंत पूर्तता

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, नवी मुंबई आणि डोंबिवली अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १२.३० किमीच्या  ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे. ऐरोली ते डोंबिवलीमधील अंतर थेट १० किमीने कमी करणाऱ्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे.

   सध्या काम वेगात सुरू असून पहिल्या टप्प्यातील संपूर्ण काम (भुयारी मार्गासह) मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. तर दुसरा टप्पा डिसेंबर २०२२ ला पूर्ण होणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले तरी ऐरोली ते काटई असा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास आणि यावरून नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत पार करण्यास काहीशी प्रतीक्षा करावी लागणार असून तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू झालेले नाही.

आज घडीला नवी मुंबईहून डोंबिवलीला जाण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. शिळफाटा आणि महापे रोडला वळसा घालून जावे लागते. यादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. एकूणच आज ऐरोली ते डोंबिवली अंतर पार करण्यासाठी ४५ मिनिटे घालवावी लागतात. कधी हा वेळ एक तासाच्याही पुढे जातो. ही बाब लक्षात घेत ऐरोली ते काटई नाका उन्नत रोड हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हे अंतर केवळ १५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. नवी मुंबई ते डोंबिवली अंतर १० किमीने कमी होणार आहे.  कामाला गती देत प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

तीन टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पातील दोन टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे दोन भाग आहेत. यातील एक भाग ठाणे-बदलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग ४ उन्नत रोड (९३५ मीटर लांब) असा आहे. दुसरा भाग सेंट्रल एमआयडीसी रोड ते राष्ट्रीय महामार्ग ४ मुंब्रा भुयारी मार्ग (१६९० मीटर) असा आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा मुलुंड-ऐरोली ते ठाणे बदलापूर उन्नत रोड (३.४३ किमी आणि ३-३ मार्गिका) असा आहे. तर तिसरा टप्पा राष्ट्रीय महामार्ग ४ ते काटई नाका उन्नत रोड (६.२९ किमी) असा आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील पहिला भाग मार्च २०२२ मध्ये तर दुसरा भाग मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मोठ्या दिलाशासाठी प्रतीक्षा…

प्रकल्पाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यास वाहनचालक-प्रवाशांची काही अंशी वाहतूक कोंडीतून सुटका होईल, मात्र नवी मुंबई ते डोंबिवली अशा संपूर्ण मार्गावरून प्रवास करण्यासाठी, हे अंतर केवळ १५ मिनिटांत पार करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. तिसरा टप्पा अजून सुरू होणे बाकी आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे ऐरोली ते कटाई नाका हा १२.३० किमीचा उन्नत मार्ग प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे लागणार आहेत. पण हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic congestion in mumbai metropolitan area mmrda with subway akp

ताज्या बातम्या