मुंबईतील कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या मरीन ड्राइव्हजवळील एनएस मार्गावर या रोडचं काम सुरू आहे. मात्र, त्यापूर्वी मरीन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील कॅरेजवेवर म्हणजेच तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना दरम्यान एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचे काम करणे आवश्यक आहे. दरम्यान, या कामाला पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने दक्षिण मुंबईत वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा – “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना शूद्र म्हणणाऱ्या सनातन्यांना….” जितेंद्र आव्हाड आक्रमक
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचं काम याच आठवड्यात सुरू होणार असून या कामासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एनएस मार्गावरून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याजवळील सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रवासाठी एनएस मार्गाचा वापर करणे टाळावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच दक्षिण मुंबईतून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी महर्षी कर्वे रोड, केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, चर्चगेट स्टेशन या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.