मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्गात अडथळा ठरलेल्या चेंबूरमधील सर्व दुकानदार आणि झोपडीधारकांना पर्यायी जागा दिली. मात्र पर्यायी जागा मिळाल्यानंतर काही प्रकल्पबाधितांनी पुन्हा या परिसरात दुकाने थाटली असून यामुळे वाहतूक कोंडीच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे.
शहरातील वाहतूक कोंडीमुळे दक्षिण मुंबईत जाणाऱ्या वाहनांना पूर्वी मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याला पर्याय म्हणून एमएमआरडीएने २००७ मध्ये पूर्व मुक्त मार्गाच्या कामाला सुरुवात केली. याच वेळी एमएमआरडीएने या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सर्व झोपडीधारकांचे आणि दुकानदारांचे परिसरातच पुनर्वसन केले. मात्र गेल्या काही वर्षांत पुनर्वसन केलेल्या अनेक दुकानदारांनी दिन क्वारी मार्गालगत अतिक्रमण करून पुन्हा दुकाने थाटली आहेत. परिणामी, येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पांजरापोळ परिसरात आद्यपही मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती असून याच मार्गावरून या नागरिकांनाची ये-जा सुरू असते. मात्र दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शिवाय या अतिक्रमणामुळे रस्ता अगदीच निमुळता झाल्याने, ट्रकसारखी वाहने या परिसरातून जाऊ शकत नाहीत. आग अथवा इतर कुठलीही दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अनेक अडथळय़ांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.