scorecardresearch

कल्याण, भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी आता दूर; रखडलेल्या दुर्गाडी पुलाचे काम अखेर पूर्ण

खाडीवरील एक पूल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करून नवीन पूल बांधण्यात आला.

|| मंगल हनवते

रखडलेल्या दुर्गाडी पुलाचे काम अखेर पूर्ण

मुंबई : कल्याणमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) दुर्गाडी खाडी पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. या पुलाचे काम अखेर पूर्ण झाले असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हा पूल खुला झाल्यास कल्याण आणि भिवंडीतील वाहतूक कोंडी दूर होणार असून प्रवासाचा वेळही दहा मिनिटांनी कमी होणार आहे. 

खाडीवरील एक पूल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करून नवीन पूल बांधण्यात आला. मात्र हा पूलही वाहनांसाठी कमी पडू लागला. बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, टिटवाळा परिसरातील वाहनांची मोठ्या संख्येने या पुलावरून ये-जा सुरू असते. खाडीवरून भिवंडीच्या दिशेने जाण्यासाठी एकाच पुलाचा वापर करावा लागत असल्याने वाहनचालकांना एक ते दीड तास दुर्गाडी चौकात अडकून पडावे लागते. या सर्व अडचणी लक्षात घेत आणि येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने ३८०.६० मीटर लांबीचा, २५.३० मीटर रुंदीचा आणि सहा मार्गिकेचा नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

नवीन दुर्गाडी पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करून ११ मार्च २०१६ रोजी कंत्राटदाराला कार्यादेश दिले. त्यानुसार कामाला सुरुवात झाली. करारानुसार हे काम मार्च २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक कारणांनी ते रखडले. हे काम वेगाने पूर्ण करावे अशी मागणी स्थानिकांनी उचलून धरली. त्यानंतर एमएमआरडीएने कामाला वेग देत सहा मार्गिकेपैकी दोन मार्गिका पूर्ण केल्या. या दोन मार्गिका मे २०२१ मध्ये वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आणि यामुळे वाहतुकीच्यादृष्टीने वाहनचालक, प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. पण हा संपूर्ण पूल, उर्वरित चार मार्गिका कधी सुरू होतील याकडे कल्याणकरांचे, भिवंडीकरांचे लक्ष लागले होते. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली असून उर्वरित चार मार्गिकांचे काम आता पूर्ण झाले असल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. हा पूल लवकरच वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रकल्प असा आहे…

’ दुर्गाडी खाडी पूल

’ एकूण लांबी ३८०.६० मीटर

’ रुंदी २५.३० मीटर

’ पोहोच रस्ता : कोन बाजू २७० मीटर

’ कल्याण बाजू १७० मीटर

’ सहा मार्गिका (यातील दोन मार्गिका याआधीच वाहतुकीसाठी खुल्या)

’ प्रकल्पाचा खर्च १०१.७० कोटी

’ पुलाचे १०० टक्के काम पूर्ण

’ कल्याण-भिवंडीतील वाहतूक  कोंडी फुटणार

’ १० मिनिटांची बचत होणार

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic jam in kalyan bhiwandi city is now over akp