मुंबई: विधान परिषद कामकाज, सदस्य यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकारणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अहिल्यानगर येथील पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंगाची तक्रार करण्यात आली हाेती. मात्र मुंबई-पुणे वाहतूक कोंडीमुळे बुधवारी होणाऱ्या सुनवाणीस सूर्यकांत मोरे पोहोचू शकले नाहीत. यामुळे विनोदी कलाकार कुणाल कामरा, शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधातील हक्कभंगाची सुनावणी पुढील आठवड्यात १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान २३ नोव्हेंबर रोजी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेचे एकूण कामकाज, सदस्य यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. तसेच विधान परिषदेच्या सभापतींबाबतदेखील आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यात आला होता.

हक्कभंगाची तक्रार दाखल करून घेत या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली होती. या सुनावणीला हजर राहण्यासाठी मोरे मुंबईकडे रवाना झाले होते. परंतु, पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीमुळे ते प्रवासात अडकून पडले. त्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना अवगत केले. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलत आता १६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सरकारविरोधातील विडंबनात्मक गाणे सादर करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारा विनोदी कलाकार कुणाल कामरा आणि तेच गाणे, त्याच चालीवर बोलून दाखविणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविरोधातील हक्कभंगाची सुनावणी गुरुवारी होणार होती. मात्र, ही सुनावणीही पुढे ढकलण्यात आली असून आता ती १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.