सतरा प्लाझा परिसरातील बेकायदा पार्किंगचीच समस्या, उपाय करण्याऐवजी पालिका, वाहतूक पोलिसांची चालढकल

नवी मुंबई : नवी मुंबई शहर नियोजनबद्धरीत्या वसवलेले शहर म्हटले जात असताना प्रशासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे नियोजनाचा विचका होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुनियोजितपणे वसवलेल्या शहरात पाम बीच मार्गावरील सतरा प्लाझा परिसरात बेकायदा पार्किंगने आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.

पाम बीच मार्गावरील रस्त्यावरच बेकायदा पार्किंग ही पालिकेची आणि शहराची डोकेदुखी ठरली आहे. शहरात ‘व्हॅलेट पार्किंगचा’ फंडा याच ठिकाणाहून वेगाने सुरू झाला. त्यामुळे वाशीतील सतरा प्लाझासह शहरातील विविध मॉल व कमर्शिअल पार्कसमोर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. पालिकेने या ठिकाणी सुरुवातीला लोखंडी बॅरिकेट्स लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्सचा बेकायदा पार्किंग रोखण्याचा उपाय योग्य ठरणार नसून या ठिकाणी भिंत उभारण्याचा प्रस्ताव  अभियंता विभागाने घेतला. त्याला येथील दुकानदारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु आता पार्किंगचा प्रश्न जैसे थे आहे. मुळातच या भागाची पाहणी केली असता सकाळी ९.३० वाजेपर्यंत व रात्री १० नंतर या भागात कोणतीही वाहतूक कोंडी होत नाही. परंतु सकाळी सतरा प्लाझा व या विभागातील कार व इतर सुशोभीकरण व दुरुस्ती दुकाने यामुळे येथे वाहतूक कोंडी होते.

येथील दुकानदारांनी पालिकेने प्रस्तावित केलेली संरक्षक भिंत बांधण्याला प्रथम विरोध केला. नंतर याचिका मागे घेतली. त्यामुळे याबाबत पालिकेने योग्य धोरण घेण्याऐवजी येथील वाहतूक कोंडीचे कारण देत उड्डाणपुलाचे घोडे दामटवण्याचे काम सुरू केले आहे. तर दुसरीकडे वाहतूक विभाग, पालिका यांच्याकडून याच परिसरात अळीमिळी गुपचिळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही मीटर परिसरात असलेल्या वाहतूक कोंडीचे कारण देत जवळजवळ ४०० वृक्षांच्या मुळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने कोपरी ते अरेंजा कॉर्नरचा उड्डाणपूल आगामी काळात राजकीय प्रश्न म्हणून अधिक तीव्रतेने पुढे येणार असल्याचे चित्र आहे.

सतरा प्लाझामध्ये विविध प्रकारची दुकाने, कार्यालये आहेत. कोपरीपासून विविध गाडय़ांच्या खरेदी-विक्रीची व दुरुस्तीची दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग पुन्हा पाहायला मिळत आहे. तुर्भे सेक्टर १९ ई व १९ सी या ठिकाणी नियमानुसार वेअर हाऊस आहेत. परंतु व्यावसायिकांनी बेकायदा पाम बीच मार्गाच्या बाजूने दुकानांचा प्रवेश सुरू केला आहे. त्यामुळे या परिसरात पाम बीच या वेगवान मार्गावरच बेकायदा पार्किंग केले जात आहे. दुकानदारांनी मात्र  आम्ही व्यावसायिक कर भर असल्याने व्यवसाय करत असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थांच्या पळवाटाच येथील वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या २०-२२ वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहोत. आमचा प्रवेश रस्त्याच्या बाजूने आहे. पालिका आमच्याकडून व्यावसायिक दराने कर आकारते.  त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय करण्यात आमची काय चूक आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतो. येथे वाहतूक कोंडी होत नाही.  – राजू चोप्रा, व्यावसायिक