राज्यातील दुष्काळामुळे घोंघावत असलेले पाणीसंकट आणि मुंबई पोलिसांनी केलेली जनजागृती यामुळे यंदाचे धुलिवंदन मुंबईत शांततेत साजरे झाले. दारु पिऊन वाहन चालविण्याच्या घटनांमध्येही किंचित घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या ६८७ जणांवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षी ही संख्या ७४९ इतकी होती. इतरही गुन्ह्य़ांमध्ये काहीशी घट झाल्याचे यावर्षी दिसून आले. होळी पेटल्यानंतर राज्यभरात धुलिवंदनाच्या जल्लोषाला सुरुवात होते. बुधवारी रात्रीपासूनच धुलिवंदनाला सुरुवात झाली होती. रंगाचा सण साजरा करताना मद्यपान करुन गाडी चालविण्याबरोबरच भरधाव गाडय़ा चालवणे, विनाहेल्मेट मोटारसायकल चालविण्याच्या घटना दरवर्षी घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसह १ हजार २९१ वाहतूक पोलीस बंदोबस्तावर होते. ठिकठिकाणी नाकाबंदी लावून नियम तोडणाऱ्या तसेच बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. धुलिवंदन मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात होळी व धुलिवंदनानिमित्त मुंबई शहरात कटू व अप्रिय घटना घडू नयेत यासाठी मुंबई पोलीस दलाचा सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांचा ताफा शहरात सज्ज होता. निवासी भाग, महत्त्वाचे चौक आदी ठिकाणी पोलीस तैनात होते. तसेच, शहरातील पोलीस ठाण्यांनी अनेकांना या दिवसांत नोटीसा बजावल्या होत्या. तसेच, सहकारी गृहनिर्माण संस्थानाही गैरप्रकार टाळण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या होत्या. ध्वनिक्षेपकाबाबतचे व मद्यप्राशन करुन वाहने चालविण्याचे प्रकार वगळता शहरात हाणामारीसारख्या गंभीर घटना घडल्या नाहीत. दरवर्षी हाणामारी व अन्य गुन्हे घडण्याचे प्रमाण मुंबईत अधिक असते. मात्र, पोलिसांनी विशेष लक्ष दिल्याने असे प्रकार न घडल्याचे मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते, पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. ट्विटवरून तंबी मुंबई पोलीसांनी ट्विटरवर पदार्पण केल्यापासून अनेक महत्त्वाचे संदेश, मोहिमा चालविण्यात येत आहे. पोलिसांचे ट्विटरवर ८० हजार फॉलोअर्स असून त्यांच्यापर्यंत हे संदेश पोहचत आहेत. होळीच्या काळात हुल्लडबाजांनी गैरप्रकार करू नयेत यासाठी मुंबई पोलिसांनी ‘बुरा ना बनो होली है’ हॅश टॅशची निर्मिती केली होती. यावरून, त्यांनी अनेक संदेश व तंबी वजा इशारे या ट्विटर हँडलवरून प्रसारित करण्यात आले.