मारहाणीत वाहतूक पोलीस गंभीर जखमी

शहरातील २०१३ सालच्या वाहनांविषयीची माहिती वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

पेट्रोलपंपांवर उभे राहून वाहनांची माहिती घेत असताना एका वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार खार येथे घडला. जखमी झालेल्या हवालदारावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हल्लेखोराच्या लहान भावाला खार पोलिसांनी अटक केले असून हल्लेखोराला मात्र पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही.

शहरातील २०१३ सालच्या वाहनांविषयीची माहिती वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. मंगळवारी खार (प.) एस. व्ही. मार्गावरील मॅक्लॉइड पेट्रोलपंप येथे वांद्रे वाहतूक पोलीस विभागातील हवालदार विलास शिंदे (५०) माहिती घेत असताना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक दुचाकीचालक पेट्रोलपंपावर आला. त्याची माहिती घेत असताना दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याने स्पष्ट झाले. विनाहेल्मेट असलेल्या या अल्पवयीनाकडे परवाना व गाडीची कागदपत्रेही नव्हती. शिंदे यांनी दुचाकीची चावी काढून घेऊन त्याला कुटुंबीयांना बोलावण्यास सांगितले. दुचाकीस्वाराने आपल्या मोठय़ा भावाला बोलावून घेतले.

त्याचा भाऊ आणि शंदे यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर २० वर्षीय तरुणाने सोबत आणलेल्या बांबूने शिंदे यांच्या डोक्यावर हल्ला चढवला. शिंदे कोसळल्यावर त्यांच्याकडून गाडीची चावी घेऊन हल्लेखोर आणि त्याचा अल्पवयीन भाऊ यांनी पलायन केले. जखमी शिंदे यांना तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिंदे यांची प्रकृती चिंताजनक असून डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने ते कोमामध्ये गेल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. घटनास्थळाहून आरोपींचे घर अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावरच आहे. खार पोलिसांनी अल्पवयीन चालक आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन चालकास अटक केली आहे. त्याचा हल्लेखोर भाऊ बुधवारी सायंकाळपर्यंत पकडण्यात आले नव्हते.

वाहतूक पोलिसांकडून माहिती घेण्याच्या या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी बाचाबाची, वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांतर्फे पेट्रोलपंपांवर ही माहिती का जमा करण्यात येत आहे, याविषयी फलकही लावण्यात आले आहेत. परंतु, तरीही चालकांकडून माहिती न देण्याचे, अरेरावी करण्याचे प्रसंग झडत आहेत.

मोहीम वाहनचालकांच्या फायद्यासाठी

वाहतूक पोलिसांकडून वाहनचालक, मालक, त्यांचे संपर्क क्रमांक, गाडी क्रमांक, नोंदणीचे वर्ष याची महिती घेण्यात येत आहे. ही माहिती एकत्रित करून ती वाहतूक पोलिसांकडे जमा करण्यात येत असून ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणार आहे. याचा फायदा गाडय़ा चोरीला गेल्यानंतर त्याचा शोध घेण्यास किंवा नाकाबंदीदरम्यान तपासणी करताना होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Traffic police injured in beating

ताज्या बातम्या