मुंबई : आतापर्यंत सागरी किनारा मार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवणाऱ्या ३२६० जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सागरी किनारा मार्गावर भरधाव वेगात गाडी चालवणे, गाड्यांची स्पर्धा यामुळे रात्री आवाजाचा मोठा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत असून या मार्गावर ध्वनिरोधक (साऊंड बॅरिअर) बसवावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाला केली आहे.
सागरी किनारा मार्ग विनाअडथळा, विनासिग्नल असा मार्ग असून या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या अनेकदा वेगमर्यादा ओलांडतात. सागरी किनारा मार्गावर ताशी ६० ते ८० किमी वेगमर्यादा अपेक्षित असून काही वेळ यापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवली जातात. त्यामुळे अपघातही होण्याची शक्यता असते. तसेच सागरी किनारा मार्गावर रात्री मोटारगाड्यांची स्पर्धाही सुरू असतो. रात्री १० ते १२ या वेळेत श्रीमंतांच्या महागड्या गाड्या, मोठा आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स कार यांची स्पर्धा व त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी वाहतूक पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे केल्या होत्या.
रात्री १० नंतर या मार्गावर भरधाव वेगात गाड्यांची स्पर्धा करण्यात येते. त्यात बहुसंख्य श्रीमंतांचा समावेश असतो, असा आरोप येथील नागरिकांनी केला होता. रात्री १० ते १२ या वेळेत या मार्गावर मोटारगाड्यांची गाड्यांची स्पर्धा सुरू असते. या परिसरातील रहिवाशांनीही डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले होते. अशा भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्या आणि गाड्यांच्या स्पर्धांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांकडेही मदत मागितली होती.
तसेच दिवसाही या मार्गावर गाड्या वेगात भरधाव धावतात. त्यामुळे अपघात होतात. डिसेंबर महिन्यात सागरी किनारा मार्गावर एक अपघात झाला होता. या अपघातात कंत्राटदाराचा एक कर्मचारीही मृत्युमुखी पडला होता. गेल्या आठवड्यात या मार्गावर अत्यंत वेगात धावणारी एक बीएमडब्ल्यू गाडी दुभाजकावर आदळली होती. वेगवान गाड्यांचा हा त्रास अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने तंत्रज्ञानाबरोबरच पोलिसांचीही मदत घेण्याचे ठरवले होते ताडदेव वाहतूक हद्दीतील सागरी किनारा मार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, तसेच हायवे पोलीस यांच्या स्पीड गन वाहनांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ३२६० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
मात्र भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे विशेषतः रात्री चालणाऱ्या स्पर्धांमुळे येथील रहिवासी संकुलांतील रहिवाशांना, रुग्णालयातील रुग्णांना गाड्यांच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे या मार्गावर ध्वनिरोधक बसवावेत, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाला केली आहे.