वांद्रे खेर नगर आणि खेरवाडीत समस्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वांद्रे खेरवाडी येथे पुरुषोत्तम हायस्कूल आणि खेरवाडी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाहतुक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वांद्रे पूर्व खेर नगर भागात दुपदरी रस्ते नाहीत. त्याचा फटका या भागातील शाळांना बसत आहे. शाळेतील मुलांना दुपारच्या वेळेस शाळा सुटताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वाहनांच्या गराडय़ातून चालताना मुलांची आणि पालकांची रोज कसरत घडत असल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.

या शाळेच्या परिसरातून पश्चिम द्रुतगती मार्गाकडे जाण्यासाठी दुपदरी रस्ते नाहीत. त्यामुळे, शाळेबाहेर रिक्षा आणि वाहनांची एकच कोंडी होते. त्यातच या दोन्ही शाळा एकाच वेळी सुटत असल्याने आणि दुसऱ्या सत्रातील शाळा भरण्याची वेळ एकच असल्याने या वेळेस विद्यार्थी-पालकांची मोठी गर्दी होते.जवळच असलेल्या रहेजा महाविद्यालयाच्या आणि स्थानिकांच्या वाहनांचे पार्किंग रस्त्यांवरच आहे. रस्ते आक्रसल्याने या त्रासात आणखी भर पडते. वाहतुक कोंडीमुळे जो काही कलकलाट होतो त्याचाही त्रास वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना होतो, अशी तक्रार या शाळेचे शिक्षक करत आहेत. दोन्ही शाळांच्या वेळा समान असल्याने आम्ही आमच्या शाळेची वेळ बदलली होती. मात्र त्याचाही फारसा काही परीणाम होत नसल्याने आम्ही वाहतूक पोलिसांची मदत घेत आहोत, असे पुरुषोत्तम शाळेचे शिक्षक शशिकांत आमिन यांनी सांगितले.

अशीच काहीशी परिस्थिती खेरवाडी महापालिका शाळेच्या आवाराबाहेर देखील पाहायला मिळते. तेथे पदपथावरच अनधिकृत झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांना पदपथावरून चालणे अशक्य होते.

शाळेच्या वेळेस वाहनांची वर्दळ जास्त असल्याने मुलांच्या जीवालाही धोका असल्याची भीती येथील रहिवासी किशोर खेर यांनी व्यक्त केली. या बाबत प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रार खेर यांनी केली आहे.

पालकांचा जीव मुठीत

शाळेच्या आवाराबाहेर मुलांना ये-जा करण्यासाठी सुविधा नसल्याने येथील पालक आणि विद्यार्थी शाळेत पोहोचताना जीव मुठीत धरुन ये-जा करत आहेत. याबाबत पालिका विभाग उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांना संबधित विचारले असता पदपथावरील संबधित अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र एकूणच येथील वाहतूकीचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थापन केल्याशिवाय हा त्रास संपणार नाही, अशी परिस्थिती आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic problem create trouble for schools
First published on: 18-10-2016 at 02:47 IST