मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अमली पदार्थ तस्कर अली असगर शिराजीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी ‘बिग बॉस’फेस अब्दू रोझिकला समन्स बजावले होते. त्यानुसार तो मंगळवारी ईडी कार्यालयात दाखल झाला. साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. यापूर्वी याच प्रकरणात अभिनेत शिव ठाकरेचाही ईडीने जबाब नोंदवाल होता. तस्कर शिराजीशी संबंधित एका कंपनीसोबत दोघेही खाद्यपदार्थांसंदर्भात व्यवसाय सुरू करणार होते. या कंपनीतील शिराजीच्या गुंतवणुकीबाबत ईडी सध्या तपास करीत आहे.

‘बिग बॉस’फेस अब्दू रोझिक याने या कंपनीच्या माध्यमातून ‘बुर्गीर’ नावाचा बर्गर ब्रँड बाजारात आणला होता. ईडीने ई-मेलद्वारे त्याच्याशी संपर्क साधून जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. अब्दू रोझिक परदेशात असल्यामुळे याप्रकरणी त्याचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. अखेर मंगळवारी तो त्याच्या वकिलांसह ईडीच्या कार्यालयात दाखल झाला. त्याचा जबाब सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>रुग्णाच्या मृत्युला जबाबदार ठरलेल्या ज्येष्ठ नागरिक डॉक्टरची शिक्षा कायम; मात्र वयामुळे शिक्षा भोगण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

अभिनेता शिव ठाकरे ‘ठाकरे चाय ॲण्ड स्नॅक्स’ नावाने खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू करणार होता. त्यासाठी अब्दू रोझिकप्रमाणे ठाकरेनेही एका हॉस्पिटॅलिटी कंपनीसोबत भागिदारी करण्याचा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय तस्कर अली असगर शिराजीने त्या कंपनीमध्ये काही गुंतवणूक केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. याबाबत कोणतीही कल्पना नसल्यामुळे ठाकरे त्या कंपनीच्या संपर्कात आला. ईडीने एक साक्षीदार म्हणून ठाकरे सोबत संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले. मी रेस्टॉरन्ट सुरूच केले नव्हते. त्याबाबत कोणतीही कायदेशीर करार अथवा कोणतीही औपचारिक प्रक्रिया झाली नाही. याबाबत ईडीने दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. त्याबाबत मी माहिती दिली, असे अभिनेता शिव ठाकरे याने सांगितले.

हेही वाचा >>>जंबो करोना काळजी केंद्र घोटाळा प्रकरण : संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना जामीन, सुटका मात्र नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक या दोघांनीही सिराजीच्या गुंतवणुकीची आणि गुंतवणुकीबद्दल कळल्यानंतर त्यांचे करार संपुष्टात आणले होते. ईडीने या संपूर्ण कराराबाबत माहिती घेण्यासाठी जबाब नोंंदवला आहे. संबंधित कंपनी २०२२-२३ मध्ये दोघांच्याही संपर्कात आली होती. दोन्ही कलाकारांचे नाव वापरून रेस्टॉरन्ट व्यवसाय सुरू करण्यात आला. पण शिराजी प्रकरणानंतर दोघांनीही या प्रकल्पामधून काढता पाय घेतला.

तस्कर शिराजीने अमलीपदार्थ विक्रीतून परदेशात अनेक रक्कम पाठवल्याचा ईडीला संशय आहे. त्याचा माग सध्या ईडी काढत आहे. आरोपी शिराजीने संबंधित कंपनीमध्ये ४१ लाख रुपये गुंतवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ती रक्कम कुठे गेली याबाबत ईडी तपास करीत आहे.