पश्चिम रेल्वेवर २२ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये येत्या २२ नोव्हेंबरपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्याच्या १२ वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या आता २० वर जाणार आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल सुरू झाली. चर्चगेट ते विरार, डहाणूदरम्यान धावणाऱ्या या लोकल गाडीला सुरुवातीपासूनच काहीसा अल्प प्रतिसाद मिळत आहे. या लोकलच्या दिवसाला बारा फेऱ्या होतात. करोनाकाळात बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरू केल्यानंतरही प्रवाशी संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे प्रवासी वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून प्रयत्न सुरू असून आणखी आठ फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 अप दिशेला होणाऱ्या चार फेऱ्यांमध्ये एक फेरी विरार ते चर्चगेट, दोन फेऱ्या बोरिवली ते चर्चगेट आणि एक फेरी गोरेगाव ते चर्चगेट दरम्यान होणार आहे. तर डाऊनला होणाऱ्या चार फेऱ्यांमध्ये एक फेरी चर्चगेट ते नालासोपारा, दोन फेऱ्या चर्चगेट ते बोरिवली आणि एक फेरी चर्चगेट ते गोरेगाव होईल. दरम्यान, चर्चगेटमधून वांद्रे स्थानकासाठी सुटणारी सकाळी ९.०७ वाजताची धिमी लोकल आणि वांद्रे स्थानकातून चर्चगेटसाठी जाणारी सकाळी ९.४७ची लोकल रद्द करण्यात आली आहे.