गेल्या तीन दिवसांत मध्य रेल्वेवर गाडी रूळावरून घसरल्याच्या घटना सहा वेळा घडल्या आहेत. यापैकी तीन घटना यार्डात घडल्याने त्याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला नाही. मात्र तीन घटना मुख्य रेल्वेमार्गावर झाल्याने मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाचा चांगलाच बोजवारा उडाला. हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या विस्तारीकरणाच्या नादात मध्य रेल्वेचे नेहमीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यानेच या घटना घडत असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
मध्य रेल्वेवर तीन दिवसांपूर्वी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे हार्बर मार्गावर काम चालू असताना खडीने भरलेल्या मालगाडीचा एक डबा घसरला. त्यामुळे ऐन सकाळी हार्बर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हार्बर मार्गावर वाशीजवळ एका गाडीचे मोटर डब्याला जोडणारा लोखंडी भाग तुटून रूळाला घासल्याने गाडी रूळावरून उतरण्याची घटना घडली होती. तर गुरुवारी पळसदरी येथे मालगाडी घसरल्याने कर्जत-खोपोली दरम्यानची वाहतूक ठप्प झाली.
त्याशिवाय विद्याविहार, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि माटुंगा येथे यार्डात गाडय़ा घसरण्याच्या तीन घटना घडल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. सध्या एमआरव्हीसी मध्य रेल्वेवर हार्बर मार्गाच्या १२ डब्यांच्या विस्तारीकरणासाठी मोठे काम करत आहे. मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारीही त्याच प्रकल्पाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील इतर महत्त्वाच्या कामांकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांकडून मिळते.

तो ‘बिघाड’ नव्हताच!
दोन दिवसांपूर्वी वाशी येथे झालेली घटना ही सिग्नल यंत्रणेतील बिघाड असल्याचे रेल्वेतर्फे रंगवण्यात आले होते. मात्र अधिक माहिती घेतली असता पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एका रेट्रोफिटेड गाडीच्या मोटरचा लोखंडी स्टँड निखळून रूळाला घासत होता. त्यामुळे गाडी दोन वेळा रूळावरून घसरून पुन्हा रूळांवर आली. या दरम्यानच हा स्टँड सिग्नल यंत्रणेला लागल्याने ती निकामी झाली होती. अखेर ही गाडी वाशी येथे थांबवून ती रिकामी करून कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. गाडी रूळावरून घसरण्याची घटना वाशी खाडीच्या पुलावर घडली असती, तर भीषण अपघात झाला असता. सुदैवाने असे काहीच घडले नाही. मात्र रेल्वेने हा बिघाड सिग्नल यंत्रणेतील असल्याचे सांगत हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

पश्चिम रेल्वेच्या सात स्थानकांवर लवकरच वैद्यकीय मदत कक्ष
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सात रेल्वे स्थानकांवर या महिन्याच्या अखेरीस वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. सध्या मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि गोरेगाव या रेल्वे स्थानकांवर हे कक्ष सुरू झाले आहेत. चर्चगेट, बोरिवली आणि विरार रेल्वे स्थानकांवर १६ फेब्रुवारीस तर अंधेरी, कांदिवली, वसई रोड व पालघर या रेल्वे स्थानकांवर २६ फेब्रुवारी रोजी हे कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेने हे काम एका संस्थेकडे दिले असून त्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकी एक डॉक्टर, परिचारिका आणि साहाय्यक या कक्षात असणार आहेत. रेल्वे अपघातात जखमी होणाऱ्यांवर प्रथमोपचार व तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हे कक्ष सुरू केले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.