गणेशोत्सव काळात प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या जादा गाडय़ा एकेरी मार्गावरून वळवताना कठीण होत असल्याने गेले काही दिवस अनेक गाडय़ांचे वेळापत्रक विस्कटले आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीनिमित्त तीन ते चार दिवसांची सुट्टी घेऊन गावी गेलेल्या प्रवाशांचे मुंबईत परतताना हाल होत आहेत. रविवारी मडगावहून मुंबईच्या दिशेने येणारी विशेष गाडी सुमारे सहा तासांहून अधिक काळ उशिराने धावत होती. त्यात गाडय़ा उशिराने धावत असल्याचे नेमके कारण कळत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती.
दरवर्षी गणपतीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने यंदा २५० हून अधिक गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर सोडल्या आहेत. मात्र गेली अनेक वर्षे मार्ग दुहेरी करण्याची योजना घोषणांच्या कचाटय़ात अडकल्याने जादा गाडय़ांचे वेळापत्रक विस्कटत आहे. त्यामुळे काही गाडय़ा एक ते दीड तास उशिराने धावत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली. मात्र गाडय़ांच्या वेळापत्रकाचे नियोजन करणे रेल्वे प्रशासनाला अडचणीचे जात असतानाच याचा मोठा फटका प्रवाशांना बसत असल्याने अनेक स्थानकांवर प्रवासी तक्रारी नोंदवत आहेत.
गाडी क्रमांक ०१००२ या गाडीला मडगावहून येण्यासाठी सहा तासांचा कालावधी लागल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत होते. अनेक कुटुंबांना रेल्वेच्या विविध स्टेशनवर ताटकळत उभे राहावे लागत असून त्यात रेल्वे प्रशासन वेळीच माहिती देत नसल्याची तक्रार स्वप्निल खोत यांनी बोलताना केली.